जिल्हा मध्यवती सहकारी बँकेकडून आपत्काळासाठी आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:30 AM2021-05-14T04:30:51+5:302021-05-14T04:30:51+5:30
रत्नागिरी : सध्या कोविड-१९ संक्रमणाची दुसरी लाट येऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा सामना राज्य व जिल्ह्यालाही करावा ...
रत्नागिरी : सध्या कोविड-१९ संक्रमणाची दुसरी लाट येऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा सामना राज्य व जिल्ह्यालाही करावा लागत आहे. कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे आपत्कालीन काळासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्य निधी व जिल्हा आपत्तीसाठी ५० लाखांची आर्थिक मदत देण्यात आली़ हा निधी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्याकडे देण्यात आला़
कोविड-१९ संक्रमण प्रादुर्भावामुळे पसरलेली रोगराई नियंत्रित करण्याकरिता व उपाययोजना करण्याकरिता सध्याचे आपत्कालीन काळात शासनाला सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला हाेता़ त्यानुसार बँकेकडून कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी २५ लाख व रत्नागिरी जिल्ह्याकरिता जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीकरिता २५ लाख असे एकूण ५० लाखामचे आर्थिक साहाय्य देण्यात आले़
या आर्थिक मदतीचे धनादेश गुरुवारी रत्नागिरी दाैऱ्यावर आलेले राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्याकडे बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, बँकेचे संचालक व आमदार शेखर निकम यांच्या हस्ते देण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या कार्यक्रमावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित हाेते़ तसेच बँकेचे संचालक ॲड. दीपक पटवर्धन, जयवंत जालगांवकर, सु. म. कालेकर, रा. दि. सुर्वे, म. द. सप्रे व बँकेचे कार्यकारी संचालक एस. एस. गुरव हे उपस्थित होते.