तिवरेतील दुर्घटनाग्रस्तांच्या भावनांचा बांध फुटलेलाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 03:53 PM2020-07-02T15:53:00+5:302020-07-02T15:54:14+5:30
संदीप बांद्रे चिपळूण : अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांच्या भावनाचा बांध आजही फुटलेलाच आहे. गेल्या वर्षभरात ...
संदीप बांद्रे
चिपळूण : अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांच्या भावनाचा बांध आजही फुटलेलाच आहे. गेल्या वर्षभरात ना पुनर्वसनाला वेग आला, ना पाणी योजनेचा प्रश्न सुटला. पिण्याच्या पाण्यासाठीही वेळोवेळी आपद्ग्रस्तांना अधिकाऱ्यांसमोर हात जोडावे लागत आहेत.
आता तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे तिवरे धरणग्रस्तांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. अनेक नेत्यांनी दिलेली आश्वासनेही आता हवेत विरली आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळणाऱ्या ५ लाख रूपयांच्या मदतीचीही आपद्ग्रस्तांना प्रतीक्षा करावी लागली आहे.
तिवरे - भेंदवाडी येथील धरण फुटीची घटना मंगळवार, २ जुलै २०१९ रोजी रात्री ९.३० वाजता घडली. या घटनेने चिपळूणच नव्हे तर महाराष्ट्र हादरून गेला. या दुर्घटनेत तब्बल २२ जणांचा बळी गेला. त्यातील दीड वर्षांची चिमुकली पूर्वा रणजित चव्हाण ही शेवटपर्यंत हाती लागली नाही.
उर्वरित २१ जणांचे मृतदेह सापडले होते. त्यामध्ये तिवरे -भेंदवाडीतील १८ जण तर पोफळी येथून मासे पकडण्यासाठी आलेले चौघेजण होते. या दुर्घटनेत १७ घरे व १३ गोठे वाहून गेले. त्यामुळे ४६ जनावरांचाही बळी गेला.
धरणफुटीच्या घटनेनंतर संबंधित दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना तत्काळ मदत मिळावी यासाठी खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, शेखर निकम यांच्या प्रयत्नांतून आपत्ती व्यवस्थापन अंंतर्गत मृत व्यक्तीसाठी प्रत्येकी ४ लाख रूपयांचा निधी, तर केंद्र शासनाकडून २ लाख रूपये असे एकूण ६ लाख रूपये देण्यात आले. त्याआधी पाटबंधारे विभागाने तत्काळ स्वरूपाची १० हजार रूपयांची मदत केली होती. मात्र, त्याव्यतिरिक्त या विभागाकडून कोणतीही मदत झालेली नाही.
त्याचवेळी राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखांची मदत जाहीर केली. मात्र, आजतागायत ही मदत या कुुटुंबियांना मिळालेली नाही. या दुर्घटनेत तिवरेसह आकले, कादवड, दादर, कळकवणे या भागातील ४५.८९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. त्याची अद्यापही भरपाई मिळालेली नाही.
तूर्तास पाटबंधारे विभागाकडून धरण परिसरात कालवा काढण्याचे काम ही दुर्घटना झाल्यानंतर गेले सात महिने सुरू होते. त्यामुळे सद्यस्थितीत येथे वस्ती करणाऱ्या कुटुंबियांचा धोका टळला आहे. साधारण ५०० मीटरपर्यंत नदीत साचलेला गाळ पूर्णत: बाजूला करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीची होणारी धूप थांबणार आहे.
पुनर्वसनाचा प्रश्न खितपत
तिवरे दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही खितपत पडला आहे. मुंबईतील सिध्दीविनायक ट्रस्टने ५ कोटींचा निधी उपलब्ध केल्यानंतरही या कामाला वेग आलेला नाही. अलोरे येथे ४३, तर तिवरे गावी १३ कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
तूर्तास अलोरेतील पुनर्वसनासाठी नुकतीच निविदा जाहीर काढण्यात आली आहे. तसेच १३ कुटुंबियांचे तिवरे येथे विनायक कनावजे यांच्या २२ गुंठे जागेत पुनर्वसन केले जाणार आहे. मात्र, अद्याप या जागेचे खरेदीखत झालेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कामही लांबणीवर पडले आहे.
१५ कुटुंबियांची पाण्यासाठी वणवण
धरणफुटीच्या दुर्घटनेत घरे वाहून गेलेल्या १५ कुटुंबियांची पर्यायी व्यवस्था कंटेनरमध्ये करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत ५, तर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ५ असे एकूण १0 कंटेनर उपलब्ध करण्यात आले असून, त्यामध्ये ही कुटुंब गेले वर्षभर राहात आहेत.
तूर्तास त्यांना वीजपुरवठा करण्यात येत असला, तरी पाण्यासाठीची त्यांची वणवण सुरूच आहे. दर चार दिवसांनी पंचायत समितीकडून टँकरने पाणी पुरविले जाते. मात्र त्यातही सातत्य नसल्याने बरेचदा अधिकाऱ्यांकडे पाण्यासाठी हात जोडावे लागतात. आता पावसाळ्यातही पावळीचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.