नारळबागेत आंतर पीक लागवडीवर भर द्यावा : बी. एन. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:38 AM2021-09-04T04:38:32+5:302021-09-04T04:38:32+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात नारळ लागवडीला प्रचंड वाव आहे. अन्य पिकांपेक्षा नारळ लागवडीसाठी भविष्य चांगले आहे. शेतकऱ्यांनी परसदार तसेच ...

Emphasis on intercropping in coconut groves: b. N. Patil | नारळबागेत आंतर पीक लागवडीवर भर द्यावा : बी. एन. पाटील

नारळबागेत आंतर पीक लागवडीवर भर द्यावा : बी. एन. पाटील

Next

रत्नागिरी : जिल्ह्यात नारळ लागवडीला प्रचंड वाव आहे. अन्य पिकांपेक्षा नारळ लागवडीसाठी भविष्य चांगले आहे. शेतकऱ्यांनी परसदार तसेच उपलब्ध मोकळ्या जागेत नारळ लागवड करावी. याशिवाय नारळ बागेत आंतरपीक घेण्याकडे विशेष कल असावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात ‘जागतिक नारळ दिन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नारळ विकास बोर्डाचे माजी सदस्य राजाभाऊ लिमये, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची उपस्थिती लाभली होती.

जिल्हा प्रशासनाव्दारे गांडूळ खत युनिट, झाप विणणे, झाडू तयार करणे या लघु उद्योगांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. भाट्ये संशोधन केंद्राने शेतकरी गट, बचतगटांना याबाबत मार्गदर्शन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषिविद्यावेत्ता डॉ. वैभव शिंदे यांनी प्रास्ताविकात नारळ लागवड आयुष्यासाठी उत्कृष्ट गुंतवणूक असल्याचे सांगितले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. कृषी विद्यावेत्ता डॉ. वैभव शिंदे यांनी नारळ लागवड आयुष्यासाठी उत्कृष्ट गुंतवणूक असल्याचे सांगितले. सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील घवाळे यांनी ‘नारळ बाग व्यवस्थापन - समस्या व उपाय’ तसेच कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी ‘नारळ पिकावरील रोग, किड व त्याचे व्यवस्थापन’ विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी झावळापासून झाप विणणे, हिरापासून झाडू तयार करणे, व्हर्जिन कोकोनट ऑईल तयार करणे, चिप्स तयार करणे, डंखविरहीत मधुमक्षिकापालन, गांडूळखतनिर्मिती, मित्रकीटकांची निर्मिती श्रेडर, स्लॅशर, ग्रासकटर, हारवेस्टर, तव्याचा कुळव इत्यादी यंत्रसामग्रींची हाताळणी करणे, नारळापासून शोभिवंत वस्तू तयार करणे याबाबत प्रात्यक्षिके सादर करण्यात आली तसेच नारळाची उत्पत्ती म्हणजेच शहाळे, तयार नारळ, नारळ झाडांच्या जातीची माहितीचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी सूत्रसंचालन तर संशोधन अधिकारी एस. एल. घवाळे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातील संतोष पाटील, शांताराम चव्हाण, प्रकाश शिंदे, दीपक साबळे, प्रियांका नागवेकर, संपदा भाटकर, शांभवी नागवेकर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Emphasis on intercropping in coconut groves: b. N. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.