ग्राम कृती दलांना ॲक्टिव्ह करतानाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या : भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:22+5:302021-06-16T04:42:22+5:30

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. बाजारपेठा सुरू झाल्यानंतर कोणीही शिस्त पाळत नाहीत. वाढत्या पॉझिटिव्ह ...

Emphasize contact tracing while activating village action forces: Bhaskar Jadhav | ग्राम कृती दलांना ॲक्टिव्ह करतानाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या : भास्कर जाधव

ग्राम कृती दलांना ॲक्टिव्ह करतानाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या : भास्कर जाधव

Next

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. बाजारपेठा सुरू झाल्यानंतर कोणीही शिस्त पाळत नाहीत. वाढत्या पॉझिटिव्ह दराबरोबरच मृत्यूचा दरही वाढला आहे. ही बाब चिंताजनक असून, लोकांना आता शिस्त लावावी लागेल. आता कोरोनाची साखळी तोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल. ग्रामीण भागात शांत असलेल्या ग्राम कृती दलांना ॲक्टिव्ह करतानाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याची सूचना आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांनी केली.

कडक लॉकडाऊननंतरही ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने आमदार जाधव यांनी चिपळूण पंचायत समितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची सोमवारी तातडीची बैठक घेतली. यावेळी आरोग्य विभाग, पोलीस तसेच प्रशासनाला जाणवणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. यावेळी समस्या मांडताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव म्हणाल्या की, एखाद्या कुटुंबात बाधित रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी केली जाते. मात्र, चाचणीवेळी ग्रामस्थ नकार देतात. बाधितांच्या संपर्कात आलेल्याची माहिती देत नाहीत. अजूनही लोक चाचणी करण्यास घाबरतात. त्यामुळे कोरोनाची साखळी वाढतच जाते. काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये परिचारिकांचा तुटवडा आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी परिचारिकांची आवश्यकता आहे. ग्राम कृती दले ॲक्टिव्ह नाहीत.

यावर आमदार जाधव, शेखर निकम म्हणाले की, आता ग्राम कृती दलांना ॲक्टिव्ह करावे लागेल. त्यासाठी तंटामुक्त समिती अध्यक्ष, सरपंच यांची ऑनलाईन बैठक घ्यावी. त्यानुसार मंगळवारी त्यांची बैठक घेण्याचे ठरले.

ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे. ही कोरोनाची साखळी तोडावीच लागेल. त्यासाठी काही कडक उपाययोजना राबवाव्या लागतील. ठोस कृती नाही केली तर मात्र परिस्थिती अधिकच चिघळत जाईल. डेरवण येथील वालावलकर रूग्णालयाशी संपर्क साधून नर्सिंग कॉलेजचे १० विद्यार्थी आरोग्य विभागाला देण्याची सूचना केली. त्यांना ने - आण करण्याचेही ठरविण्यात आले. दरम्यान, गावातील पोलीसपाटलांसह ग्राम कृती दलाला अधिक दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिथे लोक चाचणीसाठी तयार होत नाहीत, तिथे पोलिसांनी लक्ष द्यावे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांना आळा घालण्यासाठी मुख्य ठिकाणच्या चौकात कोरोनाची चाचणी करण्यात यावी. या बैठकीला प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, सभापती रिया कांबळे, उपसभापती प्रताप शिंदे, सदस्य पांडुरंग माळी, नितीन ठसाळे, नगरसेवक आशिष खातू उपस्थित होते.

-----------------------------

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी साेमवारी चिपळूण पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार शेखर निकमही उपस्थित हाेते.

Web Title: Emphasize contact tracing while activating village action forces: Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.