कर्मचाऱ्यांमुळे ‘सॅण्डी’ जाळ्यात

By Admin | Published: May 1, 2016 12:30 AM2016-05-01T00:30:05+5:302016-05-01T00:42:38+5:30

पळून जाणाऱ्या तोतया दिग्दर्शकाला पाठलाग करून पकडले

Employees cause 'Sandy' nets | कर्मचाऱ्यांमुळे ‘सॅण्डी’ जाळ्यात

कर्मचाऱ्यांमुळे ‘सॅण्डी’ जाळ्यात

Next

गणपतीपुळे : चित्रपट मालिकांचा दिग्दर्शक असल्याचे भासवत येथील हॉटेल अभिषेक बीच रिसॉर्ट व स्पा या हॉटेलमध्ये सुमारे दोन दिवस भाड्याने खोली घेऊन राहिलेला सॅण्डी उर्फ संदीप पाटील हॉटेल व्यवस्थापकाची सजगता व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याचे कारनामे आता पुढे येऊ लागले आहेत.
हॉटेल अभिषेक बीच रिसॉर्ट व स्पाचे जनरल मॅनेजर विनायक मोडक यांच्या सजगतेमुळे संदीप हा भामटा असावा, असा त्यांना संशय आला. संदीपबाबत येत असलेली शंका खरी आहे का, याचा विनायक मोडक अभ्यास करत होते. संदीप याने या हॉटेलमध्ये सुमारे २० खोल्या आरक्षित केल्या. खोल्या आरक्षित करताना सर्व सोपस्कार पार पाडायचे असतात. त्याचे ओळखपत्र व इतर लागणारी जुजबी माहिती घेताना त्याच्याकडे पैसे अगर कोणतेही आयडी प्रुफ नव्हते. त्यामुळे हॉटेलचे मालक तेंडुलकर यांना याबाबतची माहिती देण्यात आली.
दिनांक २८ रोजी अभिषेक बीच रिसॉर्ट अ‍ॅण्ड स्पाचे जनरल मॅनेजर विनायक मोडक यांनी त्याचे इंटरनेटवर नाव टाकल्यानंतर तो एक टॉपलिस्ट गुन्हेगार असल्याचे पुढे आले आणि खऱ्या नाट्याला सुरुवात झाली. मोडक यांनी प्रथमत: त्याला आपल्या केबीनमध्ये बसवून ठेवले व शुटींगसाठी येणाऱ्या गेस्टना आवश्यक असलेल्या २० रुम्सचे बुकींग झाले आहे, मात्र आपला आयडी द्या, असे सांगितले. त्यावेळी संदीप गडबडला आणि फोन आल्याचे नाटक करत बाहेर आला.
मात्र, तोपर्यंत हॉटेल अभिषेकचे कर्मचाऱ्यांनी ट्रॅप लावला होता. तो फोनवर बोलत खाली पार्किंगपर्यंत आला व त्याने आपल्याबरोबर भाड्याने मुंबईवरुन आणलेल्या गाडीच्या ड्रायव्हरला गाडी काढण्यास सांगितले आणि पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, हॉटेल अभिषेकचे कर्मचारी यांनी जनरल मॅनेजर आपल्याला बोलावत असल्याचे सांगितले आणि पुन्हा मॅनेजर यांच्या केबीनमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा फोन आला आहे, असे भासवत तो हॉटेलच्या बॉयलरपर्यंत गेला. त्या ठिकाणाहून तो बाहेर ज्या ठिकाणी गाड्या पार्किंग करतात त्या ठिकाणी गेला. तोपर्यंत हॉटेलचे कर्मचारीही त्याच्या मागावरच होते. गणपतीपुळेतील रिक्षा व्यवसायिकांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे हा भामटा येथील एका रिक्षात बसून चाफे या ठिकाणी जात असताना हॉटेल अभिषेकचे पारकर व त्यांच्याबरोबर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला ओळखले व त्या रिक्षाचा पाठलाग करत त्याला पकडून पोलिसांना माहिती देण्यात आली.
गणपतीपुळे येथील फोटोग्राफर वैभव घाग यांच्याकडे भाड्याने व्हिडीओ कॅमेरा मिळेल का? यासाठीही संदीप गेला होता, असे कळते. मात्र, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)

Web Title: Employees cause 'Sandy' nets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.