ST Strike : प्रशासनाचा दबाव झुगारून संपावर कर्मचारी ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 12:09 PM2021-12-14T12:09:45+5:302021-12-14T12:10:40+5:30
प्रशासनाने सोमवारपर्यंत कामावर हजर होण्याची सूचना केली होती. प्रशासनाच्या दबावाचा एसटी कर्मचाऱ्यांवर फारसा परिणाम झालेला नाही.
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरणाच्या मुद्यावर एसटी कर्मचाऱ्यांचे गेले ३५ दिवस कामबंद आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने सोमवारपर्यंत कामावर हजर होण्याची सूचना केली होती. प्रशासनाच्या दबावाचा एसटी कर्मचाऱ्यांवर फारसा परिणाम झालेला नाही. विभागातील खेड आगारातील एकमेव निलंबित कर्मचारी हजर झाला आहे. अद्याप ३११७ कर्मचारी संपात सहभागी आहेत.
रत्नागिरी विभागात ३७७९ कर्मचारी असून, सोमवारी ५७३ कर्मचारी कामावर हजर होते. ८९ कर्मचारी अधिकृत रजेवर आहेत. जिल्ह्यातील नऊ आगार सुरू झाले असून, दिवसभरात २५२ फेऱ्या धावल्या, सायंकाळपर्यंत तीन हजार प्रवाशांनी प्रवास केला.
संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल हाेत आहेत. शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची जबरदस्ती न करता, मुलांसाठी प्रत्यक्ष अध्यापनासह ऑनलाईन अध्यापन सुरू ठेवण्याची सूचना केली आहे. मात्र, काही मुजोर शाळांनी ऑनलाईन अध्यापन बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोरोना काळात आधीच मुलांचे नुकसान झाले आहे, त्यातच एसटी संपामुळे शहर व आसपासच्या ग्रामीण भागातील मुले भरडली जात आहे. त्यांच्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
शहरी वाहतूक बंद
रत्नागिरी विभागातील देवरुख व दापोली आगारातून सर्वाधिक फेऱ्या सुरू असून, या दोन आगारांसह राजापूर आगारातही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मंडणगड आगारातून ४ व गुहागर आणि रत्नागिरी आगारातून अवघ्या दोन फेऱ्या धावल्या. रत्नागिरी शहरी वाहतूक मात्र अद्याप बंदच आहे.