रत्नागिरीत फेब्रुवारीमध्ये रोजगार महोत्सव, उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती
By अरुण आडिवरेकर | Published: December 12, 2022 06:31 PM2022-12-12T18:31:00+5:302022-12-12T18:54:21+5:30
नोकरी देणाऱ्या कंपन्या आणि त्यांना लागणारे मनुष्यबळ याची योग्य सांगड घालण्याचे काम सुरु
रत्नागिरी : अधिकाधिक जणांना रोजगार मिळेल यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात नोकरी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. हा पथदर्शी मानून संपूर्ण राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व जिल्ह्यांमधून ७५ हजार जणांना नोकरी मिळवून देण्याबाबत नियोजन करा, असे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज, सोमवारी (दि १२) सांगितले.
जिल्ह्यात होणाऱ्या रोजगार मेळाव्याच्या तारखा व ठिकाण याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी रोजगार महोत्सवाच्या नियोजनाबाबत चर्चा केली. या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्यासह इतर प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
रत्नागिरी जिल्ह्यातून यासाठी किमान दहा हजार विद्यार्थी/विद्यार्थिनींचा सहभाग असून, त्यासाठी नोकरी देणाऱ्या कंपन्या आणि त्यांना लागणारे मनुष्यबळ याची योग्य सांगड घालण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली. या नोकरी महोत्सवासाठी असणाऱ्या सर्व बाबी, ऑनलाईन नोंदणी, प्रत्यक्ष मुलाखतीचे नियोजन याबाबतही यावेळी करण्यात आली.