नोकरीच्या संधी उपलब्ध : मापुस्कर
By admin | Published: November 27, 2014 10:47 PM2014-11-27T22:47:30+5:302014-11-28T00:09:58+5:30
मार्गताम्हाणे महाविद्यालय : विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेबाबत माहितीची अपेक्षा
चिपळूण : पदवीधर विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय व नोकरीच्या संधी भविष्यकाळात उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे विचार करिअर मार्गदर्शक आनंद मापुस्कर यांनी व्यक्त केले.
डॉ. तात्यासाहेब नातू कला व वाणिज्य महाविद्यालय, मार्गताम्हाणे येथे करिअर गाईडन्स विभागाच्या मार्गदर्शक व्याख्यानप्रसंगी मापुस्कर बोलत होते. व्याख्यानाचे प्रास्ताविक व व्याख्यात्यांची ओळख प्रा. विकास मेहेंदळे यांनी करून दिली. आपल्या जीवनात कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी अभ्यास नेहमी सराव, मार्गदर्शन यांच्याबरोबर आत्मविश्वास आवश्यक आहे. आपली आवड, व्यवसायाचा कल, स्वरुप यांचा अभ्यास केला पाहिजे, असे मापुस्कर यांनी सांगितले. सामान्यज्ञानाच्या वाढीसाठी दैनंदिन स्वरुपामध्ये वृत्तपत्रांचे वाचन करणे, रेडिओ व दूरदर्शनवरील बातम्या ऐकणे याची सवय केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
कोकण विभागाशी संबंधित असणाऱ्या शेतीपूरक उद्योग, फळप्रक्रिया उद्योग, मत्स्य व्यवसाय आणि पर्यटन यांच्यामध्ये भविष्यकाळात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयाने पुरवलेल्या सुविधा, मार्गदर्शनासाठी घेतले जाणारे कार्यक्रम यांचा उपयोग करुन आपले भवितव्य उज्वल करावे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. प्राचार्य विजयकुमार खोत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. संगीता काटकर, प्रा. माने, प्रा. रावळ अन्य शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)