अतिक्रमण कारवाई : रत्नागिरी शहरातील अतिक्रमणांवर येणार टाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:50 AM2019-03-01T11:50:25+5:302019-03-01T11:53:09+5:30
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर क्रीडांगणाच्या पुढील बाजूस बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटविण्याच्या विषयावरून गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा शिवसेना व स्वाभिमान असा संघर्ष झाला. मारुती मंदिर येथील क्रीडांगणासमोरील परिसराला पोलीस छावणीचे रुप आले होते. अखेर भाजी विक्रेत्यांच्या मागणीनुसार संपूर्ण शहरात शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर मारूती मंदिर येथील तणाव गुरुवारी निवळला
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर क्रीडांगणाच्या पुढील बाजूस बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटविण्याच्या विषयावरून गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा शिवसेना व स्वाभिमान असा संघर्ष झाला. मारुती मंदिर येथील क्रीडांगणासमोरील परिसराला पोलीस छावणीचे रुप आले होते. अखेर भाजी विक्रेत्यांच्या मागणीनुसार संपूर्ण शहरात शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर मारूती मंदिर येथील तणाव गुरुवारी निवळला.
मारुती मंदिर येथील भाजी विक्रेत्या महिलांना महिनाभरापूर्वीच क्रीडांगणामागील नगर परिषदेच्या इमारतीत भाजी विक्रीसाठी जागा, गाळे उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र तेथे ग्राहकच येत नाहीत. तसेच क्रीडांगणासमोरील रस्त्यालगत अन्य भाजी विक्रेते व्यवसाय करतात, अशी भाजी विक्रेत्यांची तक्रार होती.
अतिक्रमण कारवाई : रत्नागिरी शहरातील अतिक्रमणांवर येणार टाच
जोपर्यंत सर्वांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मूळ जागेवरच या भाजी विक्रेत्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत स्वाभिमान पक्षाने या भाजी विक्रेत्यांना पाठींबा दिला होता. स्वाभिमान पक्षाचा जयजयकार करणाऱ्या घोषणाही यावेळी भाजी विक्रेत्यांनी दिल्या.
मारूती मंदिर रस्त्यालगत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तेथे वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी पर्यायी जागा या भाजी विक्रेत्यांना दिली होती. तरीही पुन्हा त्याच जागेवर भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने त्यांना हटविण्यासाठी गुरुवारी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मात्र आम्ही केव्हाही ही जागा मोकळी करून देण्यास तयार आहोत. मात्र सर्वांना एक नियम लावा. शहरातही अतिक्रमणे हटवा. आम्ही येथून पर्यायी जागेत स्वत:हून जाण्यास तयार असल्याचे भाजी विक्रेत्या महिलांनी नगर परिषद अधिकारी तसेच पोलिसांनाही सांगितले.
मारूती मंदिर येथील या भाजी विक्रेत्या महिलांनी रस्त्यालगतच ठाण मांडले. नगर परिषद अधिकारी मुकेश शेट्ये व अन्य अधिकाऱ्यांनी भाजी विक्रेत्यांना समजावले. त्यानंतर पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनीही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनीही तेथे येऊन परिस्थितीची माहिती घेतली.
त्यानंतर नगराध्यक्षांशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी संपूर्ण शहरात अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्याची घोषणा नगराध्यक्ष साळवी यांनी केली आहे. ही मोहीम पोलीस बंदोबस्तामध्ये राबवली जाणार आहे. शहरातील रस्त्यांवर जागा अडविणारे भाजी, फळ विक्रेते व अन्य व्यावसायिक, पदपथांवरील व्यावसायिक यांच्या अतिक्रमणांचा त्यात समावेश आहे.
पर्यायी जागा देणार
रत्नागिरी शहरातील रस्ते व पदपथ हे फिरते विक्रेते, स्टॉल्स, भाजी व फळ विक्रेते यांनी अडविले आहेत. त्यामुळे शहरातील ज्या भागात वाहतूकीला अडथळा येत आहे तेथे रस्ते व पादचाऱ्यांसाठी पदपथावरील ही अतिक्रमणे हटविण्याची भूमिका नगर परिषदेने घेतली आहे. अतिक्रमणे हटविताना भाजी, फळ विक्रेत्यांना पर्यायी जागाही नगर परिषद देणार असल्याचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.