रत्नागिरीत अतिक्रमणे हटवली, नगर परिषदेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:43 AM2019-03-02T11:43:00+5:302019-03-02T11:44:14+5:30
रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने वाहतुकीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तामध्ये हटवली. अतिक्रमणविरोधी पथकाने दिलेल्या सुचनांनुसार व्यावसायिकांनीही या मोहिमेला सहकार्य करीत आपले बस्तान हलवून रस्ते मोकळे केले.
रत्नागिरी : शहरातील मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने वाहतुकीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तामध्ये हटवली. अतिक्रमणविरोधी पथकाने दिलेल्या सुचनांनुसार व्यावसायिकांनीही या मोहिमेला सहकार्य करीत आपले बस्तान हलवून रस्ते मोकळे केले.
मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या पुढील बाजूस बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटविण्याच्या विषयावरून गुरुवारी सायंकाळी शिवसेना व स्वाभिमान पक्ष असा संघर्ष झाला होता. भाजी विक्रेत्यांच्या मागणीनुसार संपूर्ण शहरात शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार असल्याची घोषणा प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केली होती.
शुक्रवारी सकाळपासून रत्नागिरी मुख्य एस. टी. बस स्थानकासमोरील रस्त्यावरील भाजी, फळ विक्रेत्यांना रस्ता मोकळा करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर या रस्त्यावरील अतिक्रमण केलेली जागा विक्रेत्यांनी मोकळी केली. मात्र, त्यातील काही भाजी, फळे, फूल विक्रेते यांनी दुकानांच्या पायऱ्यांवर आपली दुकाने थाटल्याचे दिसून येत होते.
रामआळीतील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांनाही हटविण्यात आले. गोखले नाका ते विठ्ठल मंदिरपर्यंत रस्त्याच्या कडेला भाजी, फळे तसेच अन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनीही नगर परिषदेच्या निर्देशानुसार रस्ते मोकळे करून दिले.
मारुती मंदिर येथील भाजी विक्रेत्या महिलांना महिनाभरापूर्वीच क्रीडांगणामागील नगर परिषदेच्या इमारतीत भाजी विक्रीसाठी जागा, गाळे उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, तेथे ग्राहकच येत नाहीत. तसेच क्रीडांगणासमोरील रस्त्यालगत अन्य भाजी विक्रेते व्यवसाय करतात, अशी भाजी विक्रेत्यांची तक्रार होती. मात्र, या कारवाईनंतर मारूती मंदिरचे विक्रेतेही आपल्या जागी परत गेले.
पथकाची गस्त सुरू राहणार
शहरातील अतिक्रमणे हटविण्यात आली असली तरी पुन्हा अतिक्रमणे केली जाऊ नयेत, यासाठी दररोज नगर परिषदेचे अतिक्रमणविरोधी पथक गस्त घालणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असून, त्यांचा विक्रीयोग्य मालही जप्त केला जाणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे व अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.