अखेर तलाठ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:31 AM2021-03-19T04:31:07+5:302021-03-19T04:31:07+5:30

रत्नागिरी : कोरोना काळात पहिल्या फळीत राहून ग्राम स्तरावर कोरोनाशी लढा देत काम करणाऱ्या तलाठ्यांचे तीन महिन्यांचे वेतन शासनाकडून ...

In the end, the question of salary of Talathas was solved | अखेर तलाठ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी

अखेर तलाठ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी

Next

रत्नागिरी : कोरोना काळात पहिल्या फळीत राहून ग्राम स्तरावर कोरोनाशी लढा देत काम करणाऱ्या तलाठ्यांचे तीन महिन्यांचे वेतन शासनाकडून निधी न आल्याने रखडले होते; मात्र आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे वेतन झाले असून, अजूनही फेब्रुवारी महिन्याच्या वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून काेरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून तलाठ्यांचे वाढीव काम सुरू झाले आहे. मार्च महिन्यात लाॅकडाऊन झाल्यानंतर ग्राम स्तरावर स्थापन केलेल्या कृती दलाच्या माध्यमातून गावात अडकलेल्या स्थलांतरित लाेकांना अन्नधान्याचा पुरवठा करणे, गावात आजारी असणाऱ्यांची माहिती घेणे, गृह विलगीकरण तसेच संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या व्यक्तींसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, आदी कामांमध्ये तलाठी व्यग्र झाले. लाॅकडाऊनच्या काळात एका तलाठ्याकडे दोन - तीन गावांचा भार असल्याने दिवसरात्र काम करावे लागत होते.

त्यातच ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाचा फटका जिल्ह्याला बसला. दापोली, मंडणगड आदी किनारी लगतच्या तालुक्यांमधील अनेक गावांना याचा फटका बसला. कोरोनाचे संकट सुरू असतानाच निसर्ग आणि त्यानंतर झालेल्या वादळ, पावसाने नुकसान केलेल्या भागात जाऊन तलाठ्यांना पंचनामे करावे लागत होते. रात्रंदिवस हे काम सुरू होते. अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत सातत्याने वादळाचा तडाखा ग्रामीण भागाला बसत होता; मात्र तलाठी कोरोनाचा धोका पत्करून प्रत्येक गावांमध्ये जाऊन पंचनामे करीत होते.

पहिल्या फळीत राहून काम करणाऱ्या राज्यातील या कोरोना योद्धांचे डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्याच्या वेतनापोटी येणारी रक्कम शासनाकडून न आल्याने जिल्ह्यातील सुमारे ३९७ तलाठ्यांचे वेतन थकले होते. तशातच आता मार्च महिन्याची धांदल असल्याने विविध प्रकारचा महसूल गोळा करण्यासाठी तलाठ्यांना एकही दिवस सुटी न घेता कामही करावे लागत आहे.

अखेर शासनाकडून डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या वेतनासाठी निधी आला आहे; मात्र फेब्रुवारी महिन्याच्या वेतनाची अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. संगमेश्वर तालुक्यातील तलाठ्यांचे वेतन अद्याप झालेले नाही. उर्वरित तलाठ्यांचे दोन महिन्यांचे वेतन मिळाल्याने या तलाठ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Web Title: In the end, the question of salary of Talathas was solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.