ऊर्जा विकास कार्यक्रम- सौर ऊर्जेमुळे होणार १५ लाखांची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:15 PM2021-01-29T12:15:41+5:302021-01-29T12:17:00+5:30
Zp Ratnagiri- रत्नागिरी जिल्हा परिषद भवनात अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यातून १३० कि.वॅ. ऊर्जेची निर्मिती होणार असून संपूर्ण परिषद भवनाला या ऊर्जेचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे वर्षाला सुमारे १५ लाख रुपये वीजबिलापोटी वाचणार आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरीजिल्हा परिषद भवनात अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यातून १३० कि.वॅ. ऊर्जेची निर्मिती होणार असून संपूर्ण परिषद भवनाला या ऊर्जेचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे वर्षाला सुमारे १५ लाख रुपये वीजबिलापोटी वाचणार आहेत.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ऊर्जा विकास कार्यक्रमातून ही वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी ८७ लाख ६९ हजार ८५२ रुपये निधी मंजूर झाला आहे. या कार्यालयातील खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सौरऊर्जा निर्मितीला प्राधान्य दिले आहे.
जिल्हा परिषद इमारतीला वर्षाला सुमारे २ लाख १९ हजार ८३२ युनिट विजेची गरज लागते. प्रमुख पदाधिकारी, खातेप्रमुख, पदाधिकारी यांच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा, पंख्यांचा वापर सर्वाधिक होतो. त्यांचे वार्षिक वीजबिल सुमारे १५ लाख रुपये येते. त्यासाठी सौरऊर्जा वीजनिर्मितीला आता प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वीजबिलाच्या सुमारे १५ लाख रुपयांची बचत होणार आहे.
या सौरऊर्जेतून परिषद भवनाला अविरत वीज मिळण्यास मोलाची मदत होणार आहे. या प्रकल्पातून परिषद भवनाच्या इमारतीच्या वरच्या छतावर सौर पॅनल लावण्याचे काम सुरू आहे.
प्रकल्प राबवल्यानंतर त्याला अनुदानापोटी मेडाकडून रक्कमही मिळण्यास मदत करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० च्या ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौर उपकरणे बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्या प्रस्तावानुसार एकूण ८७ लाख ६९ हजार ८५२ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या ८ ते १० दिवसांत परिषद भवन सौरऊर्जेवर चालणार आहे.
चार पंचायत समितीतही
जिल्हा परिषदेनंतर मंडणगड, गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर या चार पंचायत समिती कार्यालयांच्या इमारतींसाठीही रुफ टॉप नेट मीटरिंग सौर विद्युत संच बसविण्यात येणार आहेत.