मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; दोन तासांनी गाडी रवाना, प्रवाशांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 02:29 PM2021-12-21T14:29:19+5:302021-12-21T14:31:02+5:30

मुंबईहून मडगावकडे येण्यासाठी निघालेल्या कोकण रेल्वे मार्गावरील मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.

Engine failure of Mandvi Express The train left in two hours | मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; दोन तासांनी गाडी रवाना, प्रवाशांचा खोळंबा

मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; दोन तासांनी गाडी रवाना, प्रवाशांचा खोळंबा

Next

रत्नागिरी : मुंबईहून मडगावकडे येण्यासाठी निघालेल्या कोकण रेल्वे मार्गावरील मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. तब्बल दोन तास ही गाडी वीर स्थानकावर उभी करुन ठेवण्यात आली होती. दुसरे इंजिन जोडल्यानंतर १२.५० वाजता ही गाडी मडगावकडे येण्यासाठी निघाली.

कोकण रेल्वे मार्गावरील १०१०३ मुंबई - मडगाव मांडवी एक्स्प्रेस गाडी सकाळी मुंबईतून सुटल्यानंतर सकाळी १०.४० वाजता वीर स्थानकावर पोहोचली. या स्थानकावर आल्यावर गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे बराच वेळ ही गाडी तेथेच उभी करुन ठेवण्यात आली होती. मात्र, नेमके काय झाले आहे हे प्रवाशांना कळत नव्हते. दीड तासांनी गाडीतील फेरीवाल्याने प्रवाशांना गाडीचे इंजिन बिघडल्याची माहिती सांगितल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

त्यानंतर इंजिन दुरुस्ती काम हाती घेण्यात आले. मात्र, इंजिन दुरुस्त न झाल्याने चिपळूण स्थानकावरुन दुसरे इंजिन मागविण्यात आले. हे इंजिन आल्यानंतर तब्बल २ तासांनी १२.५० वाजता गाडी मडगावकडे रवाना झाली.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहुन सुटणारी मांडवी एक्स्प्रेस कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या अनेक प्रवाशांच्या सोयीची गाडी आहे. परंतु, ही गाडी नेहमीच पॅसेंजर गाडीप्रमाणे रखडत जात असल्याचा अनुभव येत आहे. ही गाडी कधीही वेळेत पोहोचत नसल्याने आधीच प्रवाशामंध्ये नाराजी आहे; त्यात आज इंजिनमध्ये बिघाड झाल्याने या गाडीचे वेळापत्रकच कोलमडले आहे.  हा प्रकार घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोणतीही उद्घोषणा करुन प्रवाशांना सूचना न दिल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Engine failure of Mandvi Express The train left in two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.