कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 10:23 AM2022-05-15T10:23:29+5:302022-05-15T10:23:44+5:30
इंजिनमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. ही सेवा किती वाजेपर्यंत दुरुस्त होईल, याविषयी अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. रविवारी सकाळच्या सुमारास हा बिघाड झाला असून, गाडी विलवडे स्थानकात थांबवून ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) शनिवारी रात्री निघालेली कोकणकन्या गोव्यापासून जवळपास अडीचशे किलोमीटर अंतरावर बंद पडली.
इंजिनमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. ही सेवा किती वाजेपर्यंत दुरुस्त होईल, याविषयी अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यानंतर कोकण रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झाला. परिणामी विलवडे रेल्वे स्थानकात कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये थांबली आहे. सकाळच्या वेळेस जवळपास दोन तासांपासून कोकण रेल्वेची सेवा कोलमडलेली आहे.
कोकणकन्या एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शनिवारी रात्री ११.५ वाजता सुटते. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी सोडल्यानंतर विलवडे रेल्वे स्थानकादरम्यान गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. त्यानंतर विलवडे रेल्वे स्थानकातच कोकणकन्या दोन तासांपासून थांबून आहे. मुंबईहून रात्री निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेस गोव्यातील मडगांव रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४५ वाजता पोहोचते. मात्र, दोनपेक्षा अधिक तासांपासून ही गाडी रखडल्याने प्रवाशांचे हाल झाले.