पाटबंधारे धरणांत पुरेसे पाणी
By admin | Published: December 23, 2014 12:44 AM2014-12-23T00:44:35+5:302014-12-23T00:54:56+5:30
रत्नागिरी जिल्हा : पाच धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी
रत्नागिरी : जिल्ह्यातील २२ लघु व एक मध्यम अशा एकूण २३ पाटबंधारे धरण प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात घट झाली आहे. या सर्व धरण प्रकल्पात ७० ते ९६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असून, सरासरी पाणीसाठा ७२.३० टक्के आहे. या सर्व धरणांतील सरासरी उपयुक्त पाणीसाठा ३८.३४ दशलक्ष घनमीटर्स असून, पाण्याची स्थिती चांगली असल्याची माहिती रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या हंगामात पावसाने सुरुवातीला दडी मारून सर्वांनाच अस्वस्थ करून सोडले होते. सुरुवातीला अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे भरणार काय, असा सवाल निर्माण झाला होता. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या शेतीचे व काही गावच्या नळपाणी योजनांचे काय होणार, याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, उशिराने चांगल्या प्रमाणात पाऊस झाला, अन अनेक धरणे भरली. त्यावेळीच निर्माण झालेली भीती दूर झाली होती. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या या धरणांवर शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तसेच या धरणांमुळे परिसरातील गावच्या विहिरींच्या पाण्याचीही योग्य पातळी राखली जाते.
२२ डिसेंबर २०१४ या तारखेपर्यंत पाणी साठ्याच्या अद्ययावत आकडेवारीनुसार पाणीसाठ्याची स्थिती चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५ प्रकल्पात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आहे. त्यामध्ये आंबतखोल, खोपड, मालघर (सर्व चिपळूण), शिरवली (खेड), तेलेवाडी (संगमेश्वर) या धरणांचा समावेश आहे. यातील तेलेवाडी व आंबतखोल धरणात ९५ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. मात्र, २३ पैकी कोंड्ये, गवाणे व निवे या तीन पाटबंधारे धरण प्रकल्पातील पाणीसाठी ७० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या भागात उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी आणखी घटण्याची शक्यता आहे. केळंबा व बारेवाडी या धरणांची स्थिती चांगली नसल्याने त्या धरणांमध्ये पुरेसा उपयुक्त पाणीसाठा नाही. या धरणांच्या दुुरुस्तीचे कामही गेल्या वर्षी सुरू होते. सात धरणांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे, तर ६ धरण प्रकल्पांत ८० टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा आहे. सर्व धरणांत मिळून सध्या ३८.३४ दशलक्ष घनमीटर्स उपयुक्त पाणीसाठा आहे. (प्रतिनिधी)