काँग्रेस पक्षात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:03+5:302021-09-24T04:37:03+5:30
साखरपा : दाभोळे जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यादरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
साखरपा : दाभोळे जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यादरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेश सचिव अविनाश लाड यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित केला होता. यावेळी विविध वाॅर्ड अध्यक्षांची निवड करण्यात आली.
बांबू लागवडीबाबत कार्यशाळा
चिपळूण : कोकणात बांबू लागवड व प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व चिपळूण तालुका बांबू संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ऑक्टोबरला सकाळी १० ते ४ या वेळेत कापसाळ येथील माटे सभागृहात एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत बांबू या विषयावरील तज्ज्ञ डाॅ. हेमंत बेडेकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
जंतनाशक गोळ्यांचे वाटप
आरवली : कडवई (ता. संगमेश्वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्टीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्यांचे वितरण झाले. देशाला ॲनिमियामुक्त करण्यासाठी सर्व शालेय मुलांपर्यंत जंतनाशक गोळ्यांचे वितरण होणे गरजेचे आहे. ही जबाबदारी शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका चांगल्या प्रकारे पार पाडतील असा विश्वास आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. निनाद धने यांनी व्यक्त केला.
चाकरमनी सुखावले
चिपळूण : गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी येथील आगार प्रशासनाने नियोजित फेऱ्यांसह जादा अशा तब्बल २३४ फेऱ्या सोडल्या होत्या. यासाठी केलेले योग्य नियोजन, एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर झाला आहे.
विनातिकीट तपासणी मोहीम
रत्नागिरी : एस. टी. विभागाने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तिकीट तपासणी मोहीम सुरु केली आहे. मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवासी आढळल्यास संबधितांकडून चुकविलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येणार आहे. ही मोहीम ६ ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येणार आहे.
नारळ पिकावर चर्चासत्र
रत्नागिरी : तालुक्यातील भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र व रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ पीक, खत व्यवस्थापनाविषयी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे चर्चासत्र कार्यक्रम घेण्यात आला. कृषीविद्यावेता डाॅ. वैभव शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राजेश कांबळे यांनी रिलायन्स फाउंडेशन करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली.
योगिता बांद्रे यांचा सत्कार
दापोली : दापोली पंचायत समितीच्या सभापती योगिता बांद्रे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे कुणबी समाजोन्नती संघाला वसतिगृह इमारत बांधण्यासाठी ५ कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान केला गेला.
शेंबेकर यांचा सत्कार
चिपळूण : खेर्डी गावचे सुपुत्र, समर्थभक्त रमेशबुवा शेंबेकर (रामदासी) श्री क्षेत्र सज्जनगड, सातारा यांची श्री समर्थ विद्यापीठ सातारा या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाली. त्यानिमित्त खेर्डी येथील श्री सुकाईदेवी देवस्थानच्यावतीने शेंबेकर यांचा सत्कार करण्यात आला. शेंबेकर यांची निवड झालेली निवड ही खेर्डीवासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचे जयंद्रथ खताते यांनी सांगितले.