लोटे येथील उद्योजकांचे १ सप्टेंबरपासून उद्योग बंद आंदोलन : प्रशांत पटवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:35 AM2021-08-13T04:35:46+5:302021-08-13T04:35:46+5:30
चिपळूण : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील अनियमित वीज आणि पाणीपुरवठ्याला कंटाळून उद्योजकांनी १ सप्टेंबरपासून उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला ...
चिपळूण : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील अनियमित वीज आणि पाणीपुरवठ्याला कंटाळून उद्योजकांनी १ सप्टेंबरपासून उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेले पंचवीस दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे उद्योजक हवालदिल झाले आहेत. गुरुवारी लोटे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या उद्योग भवन या कार्यालयात झालेल्या उद्योजकांच्या सभेत १ सप्टेंबरपासून उद्योग बंद ठेवून कामगारांसह रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत वीज आणि पाण्याची बिले न भरण्याचा निर्णयही बैठकीत झाला आहे.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी सांगितले की, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन सातत्याने या दोन्ही प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करीत आहे. परंतु, आश्वासनाव्यतिरिक्त काहीच पदरी पडत नसल्यामुळे संतप्त उद्योजकांनी उद्योग बंद करून कामगारांसह रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. लोटे परशुराम ही कोकणातील रासायनिक औद्योगिक वसाहत असून या वसाहतीमध्ये सुमारे दोनशे कारखाने आहेत. बहुतांश उद्योग हे रासायनिक असल्यामुळे त्यांना सलग आणि अखंड विद्युत पुरवठा लागतो. लोटे येथे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे केमिकल प्रक्रिया बंद होते आणि उद्योजकाला फार मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. अपुरा कर्मचारी, साहित्याची कमतरता, देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव आणि दर्जाहीन कामामुळे उद्योजक मेटाकुटीला आले आहेत.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून वाशिष्ठी नदीतून पाणी नेऊन औद्योगिक वसाहतीत पाणीपुरवठा केला जातो. पाणी वाहून नेणारी पाइपलाइन ही तीस वर्षांपूर्वी टाकण्यात आली आहे. ती पूर्ण निकामी आणि खराब झाली असून, पाइपलाइन फुटण्याच्या घटना वारंवार होत असतात. रासायनिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागत असल्यामुळे पाण्याअभावी उत्पादन प्रक्रिया मंदावते, यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये दहा हजार कामगार आहेत. उद्योजकांनी कंपनी बंद करून अशा प्रकारे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, त्यामुळे आता जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र औद्योगिक महाविकास मंडळ याबाबत काय निर्णय घेते याकडे उद्योजकांचे लक्ष लागून राहिले आहे.
- प्रशांत पटवर्धन यांचा फोटो मेल केला आहे.