रघुवीर घाटाच्या पायथ्याशी रंगला पर्यावरण दिन

By admin | Published: June 7, 2016 09:35 PM2016-06-07T21:35:26+5:302016-06-08T00:07:40+5:30

वन विभागाकडून मोफत रोपे : सह्याद्री विकास समिती, ध्यास संस्थेचे अभिनव आयोजन

Environment Day at the foot of Raghuveer Ghat | रघुवीर घाटाच्या पायथ्याशी रंगला पर्यावरण दिन

रघुवीर घाटाच्या पायथ्याशी रंगला पर्यावरण दिन

Next

चिपळूण : ज्या पवित्र रघुवीर घाटात पर्यटनाच्या नावाखाली आजकाल शहरातील लोक व्यसनाची हौस भागवण्यासाठी व धुमाकूळ घालण्यासाठी जातात, त्याच घाटाच्या पायथ्याशी पर्यावरण दिनी या खोऱ्यातील निसर्गप्रेमी तरुण व ज्येष्ठ निसर्ग मित्रांनी निसर्ग रक्षणाची प्रतिज्ञा घेतली. सह्याद्री विकास समिती आणि ध्यास या दोन संस्थांच्या वतीने पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
बिजघर गावी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दापोलीचे वनक्षेत्रपाल वरक यांच्या हस्ते ‘जगवण्यासाठी वृक्ष लागवड’ या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ध्यास संस्थेचे अध्यक्ष किरण जंगम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व या उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यानंतर खोपी येथील गावदेवी मंदिर परिसरात सरपंच तसेच शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी सह्याद्री विकास समितीचे उपाध्यक्ष आणि रघुवीर घाटातील रहिवासी रामचंद्र बावधाने यांनी सर्वांचे आभार मानले व भविष्यात संस्थेच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. शेवटी मुख्य कार्यक्रम सह्याद्रीच्या पायथ्याशी शिरगाव येथे झाला. संस्थेचे सचिव योगेश भागवत यांनी प्रास्ताविक केले. गेली अनेक वर्षे या भागातील संस्थेतर्फे चालवलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यानंतर संपूर्ण पंचक्रोशीतील युवा आणि ज्येष्ठ निसर्गप्रेमी नुपूर भोसले, तेजश्री भोसले, साहील भोसले, प्रतीक भोसले, प्रकाश भोसले, प्रशांत भोसले, विनोद भोसले, सीताराम भोसले, चंद्रकांत भोसले आदींचा सत्कार करण्यात आला. याचवेळी वन विभागाचे वरक आणि खेडचे वनपाल सुतार यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी सह्याद्री विकास समितीचे कॉलेज विभागप्रमुख अक्षय सोलकर, सर्पतज्ज्ञ अनिकेत चोपडे, सूरज मोरे, वनरक्षक रामदास खोत, भालचंद्र बावधाने उपस्थित होते. प्रकाश भोसले यांनी आभार मानले. त्यानंतर सह्याद्रीतील आगळ्यावेगळ्या पर्यावरण दिनाची सांगता झाली. (प्रतिनिधी)


व्यसनाची हौस भागवण्यासाठी अनेकजण रघुवीर घाटात जातात.
निसर्गप्रेमी तरूण व ज्येष्ठ निसर्गमित्रांनी घेतली निसर्ग रक्षणाची प्रतिज्ञा.
‘जगवण्यासाठी वृक्ष लागवड’ मोहिमेचा वनक्षेत्रपालांच्या हस्ते शुभारंभ.
सह्याद्रीच्या पायथ्याशी कार्यक्रम.

Web Title: Environment Day at the foot of Raghuveer Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.