Election : नवीन आघाडीच्या प्रयोगाने खेडमधील समीकरणे बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 11:31 AM2021-12-14T11:31:45+5:302021-12-14T11:32:56+5:30
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी गेल्या पाच वर्षांची मनसेसोबतची राजकीय मैत्री अचानक सोडून शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा हात धरला आहे. यामुळे खेड शहरातील शहर विकास आघाडीचे काय, असा प्रश्न आघाडीतील कार्यकर्त्यांना पडला आहे.
हर्षल शिरोडकर
खेड : राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही करण्यात येत आहे. हाच प्रयोग जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या आगामी निवडणुकीत झाल्यास खेड तालुक्यातील राजकीय आघाड्या व युती यांच्यात मोठे बदल होणार आहेत. त्याचा मोठा परिणाम खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
खेड नगर परिषदेमध्ये शहर विकास आघाडीच्या बॅनरखाली मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार संजय कदम यांनी शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवली होती. गतवेळच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये शहर विकास आघाडीतर्फे तत्कालीन मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडकर यांनी शिवसेना उमेदवार बिपीन पाटणे यांचा पराभव केला. खेड शहरातील शिवसेनेचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी संजय कदम यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणे शिवसेनेचे राजकीय विरोधक मनसेचे वैभव खेडेकर यांच्याशी स्थानिक पातळीवर हातमिळवणी करून आघाडीखाली निवडणूक लढवली होती.
या आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव व उद्योजक सदानंद कदम यांचा भक्कम पाठिंबा होता, तो आजपर्यंत कायम आहे. मात्र, आता दापोली, मंडणगडमधील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीमुळे खेडमधील शहर विकास आघाडीला सुरुंग लागण्याची शक्यता आहे आणि मंडणगड व दापोलीप्रमाणे नवीन शहर विकास आघाडी उदयास येण्याची शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवित आहेत.
डिसेंबर २०२१ मध्ये नगर परिषदेच्या सभागृहाचा कार्यकाळ संपुष्टात येत असून, त्याचवेळी नवीन समीकरणे जुळून येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी गेल्या पाच वर्षांची मनसेसोबतची राजकीय मैत्री अचानक सोडून शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा हात धरला आहे. यामुळे खेड शहरातील शहर विकास आघाडीचे काय, असा प्रश्न आघाडीतील कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे राजकीय आंदोलने, सामाजिक आंदोलने किंवा राजकीय कार्यक्रमांच्या व्यासपीठावर एकत्रित दिसणारे संजय कदम व वैभव खेडेकर यांची राजकीय समीकरणे यापुढे अशीच राहणार की बिघडणार, हे आगामी कालावधीत स्पष्ट होईल.
मनसेचा चंचूप्रवेश
खेड शहरात राष्ट्रवादी, मनसे व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठिंब्याने तयार करण्यात आलेल्या आघाडीचा प्रयोग त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये यशस्वी ठरला होता. या प्रयोगामुळे खेड पंचायत समितीमध्ये मनसेने चंचूप्रवेश मिळविला होता, तर राष्ट्रवादीने आपले पाय घट्ट केले होते.
खंबीर साथ सुटणार?
गेल्या पाच वर्षांंत नगराध्यक्ष खेडेकर यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांना सामोरे जाताना प्रत्येकवेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. त्यावेळी संजय कदम यांनीही शिवसेनेच्या विरोधात सर्वच पातळ्यांवर लढा देण्याची भीष्म प्रतिज्ञा केली होती. त्यामुळे आता नवीन समीकरण तयार झाल्यास पाच वर्षे एकत्र असणारे वैभव खेडेकर व संजय कदम विराेधात उभे राहणार आहेत.