कापसाळमध्ये लोकसहभागातून पहिला अलगीकरण कक्ष स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:27+5:302021-06-04T04:24:27+5:30
चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णांसाठी गृहअलगीकरणाची सुविधा राज्य सरकारने बंद केली होती. त्यावर उपाय म्हणून गावस्तरावरच विलगीकरण ...
चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णांसाठी गृहअलगीकरणाची सुविधा राज्य सरकारने बंद केली होती. त्यावर उपाय म्हणून गावस्तरावरच विलगीकरण कक्ष उभारणीच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कापसाळ ग्रामपंचायतीने पुढाकार घेत प्रथम अलगीकरण कक्ष सुरू केला आहे. दुकानखोरी येथील जिल्हा परिषद शाळेत लोकसहभागातून हा विलगीकरण कक्ष सुरू झाला आहे.
कोरोनाच्या वाढत्या काळात गृहअलगीकरणाचा पर्याय बंद झाल्याने बाधित रुग्णांची व्यवस्था कोठे करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून थेट गावा-गावात अलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आदेश पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयाकडून देण्यात आले होते. २०००वरील लोकसंख्या असलेल्या ३२ गावांत हे अलगीकरण कक्ष सुरू केले जात आहेत. प्रामुख्याने अलगीकरण कक्षांतील सर्वच बाबींवर ग्रामपंचायतीचा निधी खर्च न करता लोकसहभाग घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार ३२ गावांत विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
याकामी कापसाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील गोरीवले यांनी पुढाकार घेतला. अलगीकरण कक्षासाठी सढळ हस्ते मदत करण्याची हाक गावातील प्रतिष्ठित लोकांना दिली.
त्यानुसार व्यावसायिक व ग्रामपंचायत सदस्यांनी त्वरित मदतीचा हा दिला. यातून २० बेड्सचा अलगीकरण कक्ष सुरू झाला आहे. कापसाळ दुकानखोरी येथील जिल्हा परिषद शाळेत २० बेड्सची व्यवस्था केली असून, रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा आहेत. गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी या कक्षाची पाहणी करीत लोकसहभागातून कक्षाची निर्मिती केल्याने ग्रामपंचायतीचे कौतुक केले.
सरपंच सुनील गोरीवले, डॉ. विकास मिर्लेकर, डॉ. सत्यजित एकांडे व ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत या कक्षाचे उद्घाटन झाले. यावेळी माजी सरपंच रमेश शिंदे, पोलीसपाटील जय साळवी, ग्रामविकास अधिकारी संगीता खांबे, राम डिगे, दीपक साळवी, केंद्रप्रमुख सायली शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष भोसले ग्रामपंचायत कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.