ग्रामसंवाद संघाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:05+5:302021-06-09T04:40:05+5:30
महाविद्यालयातर्फे सत्कार रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक बी. सी. भिंगारदिवे व अभ्यंकर कुलकर्णी विद्यालयाच्या वाणिज्य ...
महाविद्यालयातर्फे सत्कार
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक बी. सी. भिंगारदिवे व अभ्यंकर कुलकर्णी विद्यालयाच्या वाणिज्य विभागातील प्राध्यापक एस. टी. ढोले यांच्या निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. प्राध्यापक भिंगारदिवे यांनी ३७ वर्षे, तर प्राध्यापक ढोले यांनी ३३ वर्षे १० महिने अध्यापन केले.
शिवरायांना अभिवादन
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील राजीवली ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर भगवी गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच शमिका पाटोळे, उपसरपंच संतोष येडगे, सचिन पाटोळे उपस्थित होते.
५० टक्के करवाढ
गुहागर : गुहागर नगरपंचायतीने मालमत्ता व पाणीपट्टी करामध्ये ५० टक्क्यांने वाढ केली आहे. वीज कर तिप्पट व इतर आकार दुप्पटीने वाढविला आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना करवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शाळेत विलगीकरण केंद्र
लांजा : तालुक्यातील पूनस येथे सरपंच इलियास बंदरी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. पूनस कुर्डूवाडी प्राथमिक शाळेत विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून, तीन वर्गखोल्या तयार करण्यात आल्या आहेत. विजेची, पंख्यांची व पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लसीकरण मोहीम
राजापूर : तालुक्यातील पांगरे बुद्रुक-शेंबवणे ग्रामपंचायतीमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली. सरपंच वैष्णवी कुळ्ये यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी केळवली आरोग्य केंद्राचे डॉ. आनंद सप्रे, आरोग्य सेविका सोनाली कुडाळी, ग्रामसेविका सोनाली सावंत, ग्रामपंचायत सदस्य मनोहर सावंत, संतोष कुळ्ये उपस्थित होते.
मोफत बियाणे वाटप
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील खेर्डी, शिरळ, कुंभार्ली ग्रामपंचायतींत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे, खते वाटप करण्यात आली. चिपळूण नगर परिषदेमध्ये पीपीई किट, सॅनिटायझर, मास्कचे वितरण करण्यात आले.
आयसोलेशन केंद्र स्वच्छता
चिपळूण : ‘माझे गाव माझी जबाबदारी’ अंतर्गत कोरोना संक्रमण रोखण्यासाठी खेर्डी ग्रामपंचायतीतर्फे आयसोलेशन केंद्र परिसरात साफसफाई व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. इमारतीसह परिसराचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करण्यात आली. जिल्हा परिषद पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी सहभागी झाले होते.