जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प येथे मनसे सुरक्षारक्षक सेनेची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:20+5:302021-08-20T04:35:20+5:30
राजापूर : तालुक्यातील जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पामधील सुरक्षारक्षकांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसे कामगार सेना प्रणित मनसे ...
राजापूर : तालुक्यातील जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पामधील सुरक्षारक्षकांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसे कामगार सेना प्रणित मनसे सुरक्षारक्षक सेनेचे सभासदत्व स्वीकारले. त्यानंतर प्रकल्पस्थळी मनसे सुरक्षारक्षक सेना युनिटची स्थापना केली आहे. युनिटच्या फलकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले.
कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण व सुरक्षारक्षक सेना अध्यक्ष नंदकिशोर तळवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा चिटणीस अरविंद मालाडकर यांच्या नेतृत्वाखाली कंपनीतील कामगारांनी मनसे कामगार सेना प्रणित मनसे सुरक्षारक्षक युनिटमध्ये प्रवेश केला. याठिकाणी युनिटच्या फलकाचे अनावरण जनहित कक्षाचे सरचिटणीस सुनील शिर्सेकर, कामगार सेना चिटणीस अनिरुद्ध उर्फ छोटू खामकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा चिटणीस अरविंद मालाडकर, कामगार सेना चिटणीस छोटू खामकर, उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, या प्रकल्पामधून ज्या सुरक्षारक्षकांना अन्यायकारकरित्या कामावरून कमी केले आहे, त्यांना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यास भाग पाडू. अणुऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना मनमानी कारभार करून स्थानिकांवर अन्याय करू देणार नाही. जर अन्याय झालाच तर मनसे त्याला प्रतिउत्तर नक्कीच देईल. स्थानिकांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षारक्षक सेना सदैव उभी असेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी मनसेचे दक्षिण रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत, जैतापूर येथील मनसेचे जयेंद्र कोठारकर, रत्नागिरी उपशहर अध्यक्ष मयुरेश मडके, शाखाध्यक्ष शैलेश मुकादम, नैनेश कामेरकर, दीपक तांबे व महाराष्ट्र सैनिक तसेच सर्व सुरक्षारक्षक उपस्थित होते.