स्वयंसेवक समितीची स्थापना

By admin | Published: February 6, 2015 12:08 AM2015-02-06T00:08:24+5:302015-02-06T00:45:23+5:30

तंटामुक्त समितीचा उपक्रम : कोळोशीत नऊ जणांना ओळखपत्र वाटप

Establishment of Volunteer Committee | स्वयंसेवक समितीची स्थापना

स्वयंसेवक समितीची स्थापना

Next

नांदगाव : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेले चोरीचे प्रमाण, ठिकठिकाणी आग लागून होणारे शेतकऱ्यांचे नुकसान तसेच गावच्या वार्षिक उत्सवात लागणारी स्वयंसेवकांची गरज ओळखून महात्मा गांधी तंटामुक्त समिती कोळोशीने सोमवारपासून नऊजणांच्या स्वयंसेवक समितीची स्थापना केली आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला वेताची काठी व ओळखपत्र वाटप करून एक जागृत उपक्रम हाती घेतला.वाढत्या चोरीच्या प्रमाणाला आळा बसावा, पोलीस यंत्रणेला ग्रामस्थांची साथ मिळावी व गावाच्या रक्षणाची जबाबदारी स्वत:वर घेऊन काम करावे यासाठी तंटामुक्त ग्राम समिती कोळोशीने नऊ सदस्यांना ओळखपत्र व वेताच्या काठीचे वाटप केले. हे सदस्य गावातील प्रत्येक वेळप्रसंगाला गावातील लोकांच्या मदतीसाठी काम करणार आहेत. याशिवाय या पथकाकडून कुठे आग लागली तर पथकातील सदस्य ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करणार तसेच गावात होणारे वार्षिक उत्सवाच्यावेळी स्वयंसेवकाची भूमिका पार पाडणार आहेत.यावेळी समितीचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी, सरपंच सुशील इंदप, उपसरपंच कृपाली इंदप, ग्रामसेविका एम. ए. लाड, पोलीस पाटील संजय गोरूले, दादा कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. येत्या काही दिवसात या पथकाला बॅटरी व शिट्ट्या वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)


रात्रीची गस्त ठेवणार
रात्री-अपरात्री गावात फिरणारी संशयित व्यक्ती, वाहन यांच्यावर नजर ठेवून अशा वाहनांची व व्यक्तींची या पथकाकडून चौकशी होणार आहे. संशयित व्यक्ती आढळल्यास त्याला पकडून त्याची माहिती पोलीस पाटलांमार्फत पोलीस स्थानकात देणार असल्याचे सांगण्यात आले. तंटामुक्ती समितीच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यामुळे चोऱ्यांना चाप बसणार आहे.

फेरीवाल्यांवर करडी नजर
जिल्ह्यातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात चादर विक्रेते व इतर फेरीवाले फिरत असतात. यामधील सर्रास फेरीवाले हे दुसऱ्या राज्यातील असून टोळक्या- टोळक्याने फिरत असतात. त्यांच्याकडे कोणताही पुरावा किंवा त्यांची पोलीस स्थानकात नोंद नसते. अशांची चौकशी करून गावात फिरण्यास या पथकाकडून अटकाव करण्यात येईल व पोलिसांना कळविण्यात येईल.

Web Title: Establishment of Volunteer Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.