कोरोनानंतरही जिल्ह्यातील वाद्यांचा आवाज अद्याप बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:52 PM2020-11-13T12:52:03+5:302020-11-13T12:54:00+5:30
शोभना कांबळे रत्नागिरी : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन सुरू झाले. गेल्या साडेसात ते आठ महिन्यांपासून ...
शोभना कांबळे
रत्नागिरी : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन सुरू झाले. गेल्या साडेसात ते आठ महिन्यांपासून धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने लग्न समारंभ, राजकीय, धार्मिक मिरवणुका, मंदिरांचे जीर्णोद्धार असे कार्यक्रम थांबले आहेत. याचा परिणाम विविध वाद्य व्यावसायिकांवर झाला आहे. ढोल - ताशे, बँजो, डी. जे. पथकांना अजूनही परवानगी नसल्याने या व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली, मात्र लग्न वा इतर धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने हे व्यावसायिक शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत.
लग्नसराईवरही मर्यादा
सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लग्न समारंभाला सुरूवात झाली असली, तरी त्यासाठी केवळ ५० व्यक्तींची मर्यादा ठेवण्यात आल्याने अनेकांनी लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या. सांस्कृतिक कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिली. मात्र, धार्मिक कार्यक्रमांवर बंदीच आहे. त्यामुळे वाद्यांबरोबरच मंडप डेकोरेटर्स, साऊंड, मंगल कार्यालये, कॅटरर्स यांचेही व्यवसाय अडचणीत आले आहेत.
यावर्षीचे मुहूर्त
२७, २८ नोव्हेंबर, ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७ डिसेंबर, ३, ५, ६, ७, ८, ९, १० जानेवारी, १५, १६ फेब्रुवारी, २२, २४, २५, २६, २८, २९, ३० एप्रिल, १ ते ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ मे, ४, ६,१६, १९, २०, २६, २७, २८ जून, १, २, ३, १३ जुलै.
सध्या कुठलेही कार्यक्रम होत नसल्याने आमच्या व्यवसायांवर गंडांतर आले आहे. मंडप डेकोरेटर्स, साऊंड सिस्टीम अशा सर्वच व्यवसायांवर मंदीची लाट आली आहे. कार्यक्रमांना परवानगी मिळण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे.
- पॉल खेडेकर,
नीलतारा बँजो पार्टी, रत्नागिरी.
गेल्या साडेसहा महिन्यांपासून कार्यक्रम बंदच असल्याने सर्व साहित्य गोडावूनमध्येच आहे. आता सुरूवात नव्याने करायची झाली तर सुमारे ६० -७० हजार रूपयांचा खर्च करावा लागणार आहे. त्याशिवाय आता पथकातील मुले येतील किंवा नाही, हेही पाहावे लागणार आहे. सर्व सेटअप नव्याने बसवावा लागणार आहे.
- रूपेश पेडणेकर,
शिवरूद्र ढोलपथक, रत्नागिरी.