महापूर ओसरल्यानंतरही चिपळूणचे जनजीवन ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:33 AM2021-07-27T04:33:02+5:302021-07-27T04:33:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अन्य नेत्यांनी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
संदीप बांद्रे/चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अन्य नेत्यांनी चिपळुणात दौरे केले. मात्र, अजूनही चिपळूणकरांच्या हाती काहीही मदत किंवा सहकार्य लाभलेले नाही. उलट येथील जनजीवन आजही ठप्प असून, पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य, कपडे, पाणी, वीज व पेट्रोल टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
महापुरामुळे संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त झाली, हजारो गाड्या वाहून गेल्या, तर काही निकामी झाल्या. आता पूर ओसरून तीन दिवस झाले तरी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजात सुसूत्रता आलेली नाही. बाहेरच्या ठिकाणाहून येत असलेली मदत ठराविक ठिकाणी व रस्त्यालगत असलेल्या भागात होत आहे. परंतु, अंतर्गत भागात अजूनही मदत पोहोचलेली नाही. अनेक नागरिक अन्नधान्य व अन्य वस्तूंपासून वंचित आहेत. त्याशिवाय पुरासोबत कपडे, अंथरूण वाहून गेल्याने किमान चटई, ब्लँकेट मिळावे, अशी मागणी केली जात आहे.
चिपळूणकरांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांसोबत पाहणी दौरा केला. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, चिपळूणच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, आश्वासनांशिवाय अद्याप हाती काहीच पडलेले नाही.
शहरातील काही भागात पाणी पुरवठा होत नाही. अनेकांच्या घरात अजूनही अंधार आहे. पाच दिवसानंतरही बाजारपेठ व परिसरातील रस्त्यांवर आलेल्या चिखलातून मार्ग काढताना जीव मेटाकुटीला येत आहे.
-------------------------
मदत नक्की कधी मिळणार?
शहरात नुकसानाचे पंचनामे सुरु झाले आहेत. पण, हे पंचनामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने मदत नक्की कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच काही व्यापाऱ्यांनी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत दुकानेही उघडलेली नाहीत.
------------------------------
विमा कंपन्यांच्या नियमावलीने व्यापारी हैराण
बाजारपेठेतील केवळ ३० टक्के व्यापाऱ्यांनी दुकानातील मालाचा विमा उतरवला आहे. त्याव्यतिरिक्त ७० टक्के व्यापाऱ्यांकडे विमाच नाही. अशावेळी ज्यांच्याकडे विमा आहे व ज्यांच्याकडे विमा नाही, असे दोन पद्धतीने पंचनामे केले जात आहेत. परंतु, ज्यांच्याकडे विमा आहे ते व्यापारी विमा कंपन्यांच्या नियमावलीनेच हैराण झाले आहेत.
----------------------------------
चिपळूण बाजारपेठेत यापुढे व्यापार करु नये, अशी मानसिकता तयार झाली आहे. दुकानातील मालाचा विमा उतरवूनही सुरक्षितता नसेल व अशाप्रसंगी व्यापाऱ्यांना मदत मिळत नसेल तर व्यापार, व्यवसाय न केलेलाच बरा. आता तर अन्य ठिकाणी व्यापार करायला जावे, असे वाटू लागले आहे.
- अरुण भोजने, व्यापारी, चिपळूण.