पंधरवड्यानंतरही नौका बंदरातच, मच्छिमारांचे लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:37 PM2020-08-19T15:37:09+5:302020-08-19T15:38:19+5:30
मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी मासेमारी ठप्पच आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून, मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी : मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी मासेमारी ठप्पच आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून, मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मागील मासेमारी हंगाम वादळानंतर कोरोनामुळे तोट्यात गेला होता. कोरोनाच्या भीतीने मासेमारी बंद ठेवावी लागली होती. मासेमारीच्या शेवटच्या दिवसांमध्ये मासे चांगल्या प्रमाणात मिळतात. मात्र, ऐन हंगामात कोरोनामुळे मासेमारी बंद झाल्याने खलाशीही हा हंगाम अर्धवट सोडून गेले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या मासेमारी व्यवसायावरच अवकळा पसरली होती.
दरम्यान, मागील हंगामात झालेले नुकसान चालू मासेमारी हंगामामध्ये भरून निघेल, या मच्छिमारांच्या आशेवर कोरोनासह सततच्या वादळी वातावरणाने पाणी फेरले आहे. कोरोनाच्या भीतीने खलाशी न परतल्याने सुमारे ८५ टक्के मासेमारी नौका अजूनही बंद स्थिती आहेत. मात्र, ज्या नौकांनी मासेमारी सुरु केली त्यांना निसर्गाने मोठा फटका दिला.
गेल्या पंधरवड्यामध्ये अनेकदा झालेल्या हवामानातील बदलामुळे मासेमारीला खोल समुद्रात जाणे धोकादायक ठरु शकते, त्यासाठी हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांमुळे बहुतांश मालकांनी नौका नांगरावर ठेवण्यातच धन्यता मानली.
मासेमारी ठप्प झाल्याने त्याचा परिणाम त्यावर अवलंबून असलेल्या टेम्पो, रिक्षा, पानपट्टी व अन्य व्यवसायावर झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसामुळे बहुतांश नौका नांगरावर आहेत. त्यामुळे बाजारात माशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातच कोरोनामुळे इतर राज्यात होणारी माशांची आयात-निर्यात बंदच झाली आहे.
खोल समुद्रातील मासेमारीची हीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल. आजही स्थिती फार बिकट आहे. मागील हंगाम कोरोनामुळे तोट्यात गेला. आजही कोरोनाच्या संकटासह वादळी वातावरणामुळे मासेमारी ठप्पच आहे. त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने मच्छिमारांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- निसार दर्वे,
मच्छीमार नेते, रत्नागिरी