तीस वर्षात ६ काेटी खर्चूनही पणदेरी धरण अर्धवटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:29+5:302021-07-07T04:39:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : मध्यम माती धरण प्रकल्पात मोडणाऱ्या पणदेरी धरण प्रकल्पावर तीस वर्षांत ६.८५ कोटी रुपयांचा खर्च ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : मध्यम माती धरण प्रकल्पात मोडणाऱ्या पणदेरी धरण प्रकल्पावर तीस वर्षांत ६.८५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या धरण प्रकल्पावर विविध कारणांनी खर्च करूनही प्रकल्प अर्धवट राहिल्याने धरणातील ४.०१ दशलक्ष घनमीटर पाणी दरवर्षी वापराविना फुकट गेले.
पणदेरी धरणाच्या कामाला १९८० साली प्रशासकीय मान्यता मिळाली हाेती. त्यानंतर १९८३ साली काम सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी तेरा वर्षांचा कालावधी लागला. १९९६ मध्ये घळ भरतीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर पुढील तीन वर्षांच्या कालावधीत धरण महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले. सोळा वर्षांनी म्हणजेच १९९८ साली धरणावर ४.४९ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. धरण प्रकल्प महामंडळाकडे हस्तांतरित केल्यावर या धरणाचे उर्वरित काम गतीने झाले नाही. २००८ अखेर निधीच्या विनियोगात दोन कोटी रुपयांची भर पडून हा खर्च ६.८५ कोटी रुपयांपर्यंत पोहाेचला आहे. धरणाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अजूनही निधीची मागणी होतच असते.
मुख्य धरण, सांडावा, मुख्य विमोचक यांचे काम पूर्ण झाले आहे. धरणाच्या गळतीवर प्रतिबंधक उपाययोजना, कालव्यावरील पारेषण बांधकाम दुरुस्तीची कामे अद्यापही बाकी आहेत. वास्तवात २०१० अखेर सर्व कामे पूर्ण होऊन धरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणे आवश्यक होते. मात्र, आठ वर्षांच्या कालावधीत निधीची तरतूद न झाल्याने काम कासवगतीने सुरू आहे. अंदाजपत्रक व फेरअंदाजपत्रकात वाढीव निधी खर्ची पडूनही मूळ उद्देशाप्रति काम झाले नाही. प्रकल्पासाठी ४६.२२ हेक्टर जमीन अधिग्रहित करणे अपेक्षित होते. यातील ४२.६५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. पुनर्वसनाचा नियम या धरणासाठी लागू पडलेला नाही. धरणात ४.०१ दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. धरणामुळे पणदेरी, दंडीनगरी, बहीरवली, कोंडगाव या चार गावांतील २५५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यावर्षी ५० लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
पणदेरी धरण प्रकल्प
माती धरणाची लांबी : २६५ मीटर
धरणाची उंची : २७.९० मीटर
कालव्याची लांबी : डावा कालवा ४ मीटर, उजवा कालवा २.८४ मीटर
पाणी साठवण्याची क्षमता : ४.०१ दश लक्ष घनमीटर
सिंचन क्षेत्र : २५५ हेक्टर
सिंचन क्षेत्राखालील गावे : पणदेरी, दंडीनगरी, बहिरवली, कोंडगाव