दोन महिने उलटूनही सांस्कृतिक केंद्राच्या नुकसानाचा पंचनामा गाळातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:37 AM2021-09-17T04:37:19+5:302021-09-17T04:37:19+5:30
चिपळूण : तब्बल ७ कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्यानंतर महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नुकसानाचा दोन ...
चिपळूण : तब्बल ७ कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्यानंतर महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नुकसानाचा दोन महिने उलटले तरी अद्याप पंचनामाच केलेला नाही. बेफिकीर ठेकेदार आणि प्रशासनाची उदासिनता याला कारणीभूत असल्याचा आरोप माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केला आहे. या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करुन त्यांनी थेट उपोषणाचा इशारा दिला आहे.
चिपळूणचे वैभव मानले गेलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या अद्ययावत नूतनीकरणासाठी नगर परिषदेने तब्बल ७ कोटींंहून अधिक खर्च केला आहे. नूतनीकरण होऊन केंद्र लोकार्पणासाठी तयार असताना राजकीय साठमारी सुरू झाली. त्यातून घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तांत्रिक, कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आणि लोकार्पण रखडले. दुर्दैवाने २२ जुलै रोजी चिपळूणमध्ये महापूर आला आणि सांस्कृतिक केंद्र महापुराच्या तडाख्यात सापडले. त्यानंतर अद्यापपर्यंत हे केंद्र कुलूपबंद आहे. केंद्राचा दरवाजा उघडून पाहणी करण्याची तसदीही प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी घेतलेली नाही.
कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्त केलेल्या या वास्तूची महापुरात काय दैना झाली, किती नुकसान झाले, पुढे काय करावे लागेल, याबाबत कोणीही दखल घेतलेली दिसत नाही. प्रत्यक्षात इमारत नगर परिषदेची आहे आणि खर्चदेखील नगर परिषदेनेच केला आहे. त्यामुळे आपल्या मालमत्तेचे किती नुकसान झाले, याची काळजी घेणेही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. परंतु, हे कर्तव्यच विसरल्याचा आराेप करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन महिने उलटले तरी अद्याप सांस्कृतिक केंद्राच्या नुकसानाचा अधिकृत पंचनामा करण्यात आलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासन ठेकेदाराची वाट पाहत असल्याचे समजते. ठेकेदाराला संपर्क करून तसेच पत्रव्यवहार करून बोलावण्यात आले होते. मात्र, त्यानेही पाठ फिरवल्यामुळे प्रशासन फक्त प्रतीक्षा करत थांबले असल्याची माहिती मिळत आहे. पाण्यात भिजून चिखल आणि कचऱ्यात आतील महागडे साहित्य अजून खराब हाेण्याची भीती निर्माण झाली आहे.
थेट उपोषणाचा इशारा
याबाबत माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. केंद्राच्या कामात झालेले घोटाळे महापुरात विलीन करण्यासाठी जाणूनबुजून अद्याप नुकसानाचा पंचनामा थांबविण्यात आला आहे, असा थेट आरोप करत येत्या ८ दिवसात केंद्र उघडून नुकसानाचा पंचनामा करावा अन्यथा नगर परिषदेसमोर उपोषण सुरू करू, असा इशारा मुकादम यांनी दिला आहे.