घोषणांचा पाऊस, तरी पर्यटन विकासात दुष्काळ; कोकणातील मुलभूत प्रश्नांकडेही वर्षानुवर्षे दुर्लक्ष
By मनोज मुळ्ये | Published: April 20, 2024 03:32 PM2024-04-20T15:32:44+5:302024-04-20T15:34:14+5:30
कोकणचा कॅलिफोर्निया करणे राहिले दूरच
मनाेज मुळ्ये
रत्नागिरी : विस्तीर्ण, देखणा आणि स्वच्छ समुद्रकिनारा, सह्याद्रीच्या कडेकपारी, कुठे प्राचीन मंदिरे तर कुठे विलोभनीय निसर्ग. कुठे ऐतिहासिक किल्ले तर कुठे मानवाच्या उत्पत्तीपर्यंत घेऊन जाणारी कातळशिल्पे. इतकी वैशिष्ट्ये असलेले कोकण सौंदर्याची खाण असले तरी पर्यटनदृष्ट्या मात्र कायमच अविकसित राहिले आहे.
वर्षानुवर्षे सर्वच राजकीय पक्षांनी दाखवलेली अनास्था, योग्य धोरणांचा अभाव, मूलभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष आणि पर्यटन विकासासाठी सर्व शासकीय खात्यांचे न झालेले एकत्रीकरण यामुळे पर्यटकांची पावले अजूनही कोकणाकडे वळलेली नाहीत. असे सांगितले जाते की, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ज्यावेळी कोकणच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा कोकणचे सौंदर्य पाहून ते म्हणाले की, कोकण अगदी कॅलिफोर्नियासारखा आहे. तेव्हापासून कोकणचा कॅलिफोर्निया ही संकल्पना उदयाला आली. प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कोकणचा कॅलिफोर्निया ही संकल्पना सारखी बोलून बोलून गुळगुळीत केली; पण कोकणचा कॅलिफोर्निया काही झाला नाही. गेल्या काही वर्षांत कोकणातही शहरीकरण वाढू लागले आहे; पण पर्यटनस्थळांचा विकास मात्र लांबच आहे.
विविध प्रकारच्या पर्यटन वाढीला वाव
कोकणात अनेक प्रकारचे पर्यटन विकसित होऊ शकते. त्याला मुक्त वाव आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करू शकण्याची क्षमता कोकणात आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक पर्यटनस्ळाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधांची गरज आहे.
- कोकणात प्राचीन, अतिप्राचीन मंदिरे जागोजागी आढळतात. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये राज्यभर प्रसिद्ध असणारी मंदिरे आहेत आणि दरवर्षी लाखो लोक त्या ठिकाणी भेट देतात; पण त्यात निवासी पर्यटकांची संख्या अल्प आहे. ज्यावेळी ती वाढेल, तेव्हाच स्थानिकांना रोजगार मिळेल आणि पर्यटन विकास म्हणता येईल.
- डोंगरदऱ्यांमुळे कोकणात पावसाळ्यामध्ये जागोजागी छोटे-मोठे धबधबे दिसतात. पावसाळी हंगामात काेकणाचे रूप अजूनच उजळते; पण त्याचे मार्केटिंग होत नाही. उलट कोकणात पाऊस खूप म्हणून पर्यटक इकडे फिरकतच नाहीत.
- समुद्रकिनारी वसलेल्या काेकणाला खाड्यांचे मोठे वरदान आहे. खाडीमधील बोटिंग, खाडी आणि परिसरातील जैवविविधता, पक्षीदर्शन हे सर्व खूप आकर्षक आहे; पण कोकणाबाहेरील लोकांना त्याची माहिती आहे कुठे? ते लोकांपर्यंत जाण्यासाठी शासनाचे प्रयत्नच गरजेचे आहेत.
- गडकिल्ले, डोंगरदऱ्यांमुळे साहसी पर्यटनाला मोठी संधी आहे. आजच्या तरुणाईला साहसी पर्यटनाचे आकर्षण आहे. कोकणातील डोंगरदऱ्या त्यांच्या पसंतीस उतरू शकतात; पण त्याचे आवश्यक मार्केटिंग होत नाही.
जागतिक आकर्षणाची कातळशिल्पे
- गेल्या काही वर्षांत कोकणात कातळशिल्पे मोठ्या प्रमाणात आढळली आहेत.
- त्यावर संशोधन सुरू आहे. हत्यारे विकसित झाली नव्हती, तेव्हाच्या काळात कातळावर काढलेली अवाढव्य चित्रे कदाचित मानवाच्या उत्पत्तीपर्यंत घेऊन जाणारी ही कातळशिल्पे जागतिक आकर्षण आहेत.
- त्याच्या जतनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठीही प्रसिद्धीची गरज आहे.
- कातळशिल्पे ही ग्रामीण भागात आहेत. तेथपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता ही सर्वांत मोठी गरज आहे.
रस्ते ही मुख्य समस्या
पर्यटनस्थळांच्या विकासातील सर्वांत पहिला टप्पा म्हणजे चांगले रस्ते. मुंबई गोवा महामार्गाचे काम बरीच वर्षे रखडले आहे. आताशा स्वत:च्या गाडीने फिरणारे लोक अधिक आहेत. त्यांच्यासाठी रस्ता हीच सर्वांत महत्त्वाची बाब आहे. तो नीट असेल तरच पर्यटक या भागाकडे वळतील, ही बाब स्पष्ट आहे.
खाती एकत्र हवीत
पर्यटन स्थळांचा विकास करायचा असेल तर ती केवळ पर्यटन विकास महामंडळाची जबाबदारी नाही. त्यासाठी बांधकाम, महावितरण, जिल्हा प्रशासन, पोलिस, जिल्हा परिषद अशी सर्वच खाती एकत्र यायला हवीत.
शॅक्स राहिले दूरच
सीआरझेडने वाट अडवल्याने गोव्याच्या धर्तीवर कोकणातील किनारपट्टीवर शॅक्स उभारण्याची योजना किनाjयापर्यंत पोहोचलेली नाही. असे अडथळे केंद्र सरकारमार्फतच दूर होऊ शकतात. मात्र त्यासाठी अजून कोणीच प्रयत्न केलेले नाहीत.
किनारी पर्यटन विकासात सीआरझेडची बाधा
किनारपट्टीवरील भागात अनेक सुधारणांची गरज आहे. तेथील रहिवाशांना घरालगतच अनेक उद्योग उभे करता येऊ शकतात. पण त्यात सीआरझेड हा मोठा अडथळा आहे. परवानगीची प्रक्रिया जेवढी सुलभ होईल, तेवढे लोक पुढे येतील. सध्या सीआरझेडच्या बंधनामुळे किनारी भागातील बहुतांश विकास थांबलाच आहे.