सणासुदीच्या काळातही रेल्वेच्या ‘स्पेशल’ महागड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:03+5:302021-09-07T04:39:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होतो. यासाठी गणेशभक्तांना त्यांच्या गावी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होतो. यासाठी गणेशभक्तांना त्यांच्या गावी येता यावे, यासाठी कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या सहकार्याने सुमारे २२० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोकणात येणाऱ्या या विशेष गाड्या कोरोना निर्बंधामुळे पूर्णपणे आरक्षित असून, त्यांचे तिकीटही अधिक आहे. त्यामुळे चाकरमान्यांना असेल, तरच या गाड्यांमधून दामदुप्पट दराने तिकिटे काढून येता येणार आहे.
खास गणेशोत्सवासाठी दिवा-मडगाव, दिवा-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मडगाव या पॅसेंजर गाड्याही आरक्षित असून, त्यांचे तिकीटही सुमारे ४०० रुपयांपर्यंत असणार आहे.
‘स्पेशल’ भाडे न परवडणारे?
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या असल्या, तरीही त्याचे भाडे दामदुप्पट असल्याने सामान्यांना ते परवडणारे नाही. पॅसेजर गाडीने केवळ ७२ रुपयांमध्ये मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करता येत होता. मात्र, आता स्पेशल गाडीचे भाडे परवडणार कसे?
- कृष्णा सावंत, देवळे, ता.संगमेश्वर.
कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत, त्या सर्व गाड्यांचे आधीच आरक्षण करावे लागत आहे. जवळजवळ ९० टक्के गाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. त्यामुळे आरक्षण मिळणेही अवघड झाले आहे.
- तेजस देसाई, रत्नागिरी
दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार
- पूर्वी दोन पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. त्यांचे तिकीट ७२ रुपये होते. मात्र, आता सर्वच विशेष गाड्यांचे तिकिटाचे दर ४०० रुपये आहे.
- सर्वच गाड्या आरक्षित असून, ९० टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे.
जनरल डबे कधी ‘अनलाॅक’ हाेणार
- पॅसेंजर गाडीचे तिकीट ७२ रुपये असल्याने सामान्यांना परवडणारे होते.
- दोन्ही पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने सामान्य प्रवाशांना आता विशेष गाड्यांमधून प्रवास करणे न परवडणारे होणार आहे.