रत्नागिरीतील हातिवले येथील टोलवसुली स्थगित करेपर्यंत जागेच हलणार नाही, नीलेश राणेंचा इशारा

By मनोज मुळ्ये | Published: December 22, 2022 12:48 PM2022-12-22T12:48:31+5:302022-12-22T12:49:48+5:30

टोलवसुली सुरू करण्यात आल्याने सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिक आक्रमक

Even when the work of Mumbai-Goa highway is incomplete Toll collection at Hativale in Ratnagiri, Movement led by former MP Nilesh Rane | रत्नागिरीतील हातिवले येथील टोलवसुली स्थगित करेपर्यंत जागेच हलणार नाही, नीलेश राणेंचा इशारा

रत्नागिरीतील हातिवले येथील टोलवसुली स्थगित करेपर्यंत जागेच हलणार नाही, नीलेश राणेंचा इशारा

Next

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असतानाही राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोलवसुली सुरू करण्यात आल्याने सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिक आक्रमक झाले असून, माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी सकाळपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत टोलवसुली स्थगित केली जात नाही, तोपर्यंत येथून कोणीही हटणार नाही, अशी ठाम भूमिका राणे यांनी घेतल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

याआधीही हातिवले येथे टोलवसुली सुरू करण्यात आली होती. मात्र स्थानिकांनी विरोध करुन ती बंद पाडली. बुधवार २१ डिसेंबरला अचानक ती पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे लोक आक्रमक झाले. टाेलवसुलीचा विषय वाऱ्यासारखा पसरला आणि सर्वपक्षीय लोक तेथे दाखल झाले. तेथूनच माजी खासदार नीलेश राणे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आपण गुरुवारी सकाळी १० वाजता येत आहोत, त्यावेळी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असे राणे यांनी सांगितले. त्यामुळे बुधवारी टोलवसुली थांबण्यात आली.

गुरुवारी सकाळपासूनच सर्वपक्षीय कार्यकर्ते हातिवले येथे जमा झाले. नीलेश राणे यांच्यासह काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफेही तेथे हजर झाल्या. शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे अशा सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. आमचा टोलवसुलीला विरोध नाही. मात्र जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही टोलवसुली करु देणार नाही, असे राणे यांनी ठणकावून सांगितले. जोपर्यंत टोलवसुली थांबवली जात नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दुपारपर्यंत यातून कोणताच मार्ग न निघाल्याने सर्व लोक तेथेच थांबून होते.

Web Title: Even when the work of Mumbai-Goa highway is incomplete Toll collection at Hativale in Ratnagiri, Movement led by former MP Nilesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.