आयुष्याची सायंकाळ थोडी सुसह्य..

By Admin | Published: July 18, 2014 11:11 PM2014-07-18T23:11:47+5:302014-07-18T23:13:23+5:30

दुसरे बालपण : अनसुया आनंदी महिला वृद्धाश्रमाचा सामाजिक वसा

The evening is very comfortable with life .. | आयुष्याची सायंकाळ थोडी सुसह्य..

आयुष्याची सायंकाळ थोडी सुसह्य..

googlenewsNext

शोभना कांबळे - रत्नागिरी
वृद्धत्व म्हणजे अडगळ, आपण इतरांवर भार बनून राहतो, ही अपराधीपणाची बोच बाळगत आज कितीतरी वृद्ध आयुष्य कंठीत आहेत. दुसरी पिढीही आता वृद्ध माता -पित्यांची जबाबदारी घेण्यास फारशी इच्छुक दिसत नाही. त्यातच आयुष्याचा जोडीदार आधीच कायमच्या प्रवासाला निघून गेला असेल तर मग उरलेल्याचा पुढचा प्रवास अधिकच क्लेषदायी होतो. मात्र, पावस येथील मंगला सोमणी यांनी उभारलेल्या ‘कै. ती. सौ. अनसुुया आनंदी महिला वृद्धाश्रम’मध्ये आज अनेक वृद्धा आयुष्याची सायंकाळ आनंदात व्यतीत करीत आहेत.
आजचा माणूस सुखलोलूप झाला सुखसुविधा मिळविण्यासाठी पैशांच्या मागे पळत आहे. पती - पत्नी दोघेही अर्थार्जन करणारी, त्यामुळे वेळ कमी, त्यातच जागेचीही समस्या. त्यामुळे कुटुंब संस्था मर्यादित झाली. घरातील वडीलधारी माणसं अडचणीची वाटू लागली आहेत. त्यामुळे तर ज्येष्ठांच्या समस्या अधिकच वाढल्या असून, आज वृद्धाश्रमांची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. अधिक पैसे द्यायला लागले तरी हरकत नाही, पण, ज्येष्ठांचे सर्व काही केले जाते ना, अशी मानसिकता दुसऱ्या पिढीची होऊ लागली आहे.
अशाच निराधार, घरात सांभाळायला नसणाऱ्या वृद्ध महिलांसाठी पावस येथील मंगला सोमणी यांनी १९९५ साली ‘कै. ती. सौ. अनसुुया आनंदी महिला वृद्धाश्रम’ सुरू केला. आपल्या सासुबाई आणि आई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी हा महिलाश्रम सुरू केला असला तरी आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलीचे ते स्वप्न होते. मात्र, तिचे अकाली निधन झाले. जिचे महिला वृद्धाश्रम सुरू करण्याचे स्वप्न होते, ती कायमच्या प्रवासाला निघून गेली होती. त्यामुळे ते आता अधुरेच राहणार होते.तिला दिलेल्या वास्तूतच हा वृद्धाश्रम सुरू केला.
आज येथे दहा वृध्द महिला आनंदाने वास्तव्य करीत आहेत. जावयांकडे राहाणे कसेतरी वाटते, म्हणून त्यांनी वृद्धाश्रमाचा मार्ग पत्करला . मंगला सोमणी यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. मात्र, आता गायत्री फडके यांनी कुठलीही कुरकूर न करता ही जबाबदारी आनंदाने सांभाळली आहे.
अधूनमधून मुले, नातेवाईक चौकशीसाठी येतात. पण, या वृद्धांना फडके आणि कर्मचारी नातेवाईक समजून आस्थेने काळजी घेतात, वृद्धाश्रमातील काही आजी विकलांग स्थितीत आहेत. तरीही येथील मंडळी कुठलाही दुस्वास न करता त्यांची देखभाल करतात. त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेऊन त्यांच्या औषधोपचाराकडे वेळेवर लक्ष देतात. म्हणूनच आपल्या घरापासून दूर असलेल्या या वृद्धांना आपल्या घराची ओढ सतावत नाही. वृद्धाश्रम हेच आता त्यांचे मायेचे घरटे झाले आहे.
 

Web Title: The evening is very comfortable with life ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.