अखेर कादवडच्या दोन गटातील वाद मिटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:07+5:302021-05-08T04:33:07+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : गेल्या आठवड्यात कादवड येथे नमाज झाल्यानंतर दोन गटात मारामारी होऊन शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : गेल्या आठवड्यात कादवड येथे नमाज झाल्यानंतर दोन गटात मारामारी होऊन शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. याविषयी तालुका मुस्लीम विकास मंचाने दोन्ही गटाची संयुक्त बैठक घेऊन समझोता केला. त्यानंतर हे प्रकरण कायमस्वरूपी मिटविले. त्याबद्दल दोन्ही गटाने व कादवड जमातीने चिपळूण तालुका मुस्लीम विकास मंचचे आभार मानले तर तालुक्यातून मंचाचे कौतुक होत आहे.
तालुक्यातील कादवड येथील यासिन चोघुले व अल्लाउद्दीन चोघुले या दोन गटात नमाज पडल्यानंतर बाचाबाची होऊन हाणामारी झाली होती. याविषयी शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे; मात्र चिपळूण तालुक्यात मुस्लीम समाजात प्रथमच अशी घटना घडली. त्यामुळे अनेकांनी खेद व्यक्त केला. याविषयी चिपळूण तालुका मुस्लीम विकास मंच यांनी कादवडमध्ये यासिन चोघुले व अल्लाउद्दीन चोघुले दोन्ही गटाची संयुक्त बैठक घेतली. यावेळी अध्यक्ष अन्वर पेचकर, उपाध्यक्ष सदरुदिन पटेल, प्रवक्ते निसार शेख व शकील परकार उपस्थित होते. यावेळी चिपळूण तालुका मुस्लीम विकास मंच यांनी दोन्ही गटाची भूमिका जाणून घेऊन समझोता केला. त्याचबरोबर यासिन चोघुले व अल्लाउद्दीन चोघुले यांचे मनोमिलन केले. अध्यक्ष अन्वर पेचकर म्हणाले की, मुस्लीम समाजात अशा प्रकारे वाद होणे चुकीचे आहे. यापुढे असे वाद होऊ नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे तसेच लवकरच एक गाव मंच दत्तक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.