अखेर कृषीविषयक सेवा देणाऱ्या दुकानांची वेळ वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:30 AM2021-05-15T04:30:28+5:302021-05-15T04:30:28+5:30
रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात कृषीविषयक सेवा देणाऱ्या दुकानांना ठराविक वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शहराच्या ठिकाणी ...
रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात कृषीविषयक सेवा देणाऱ्या दुकानांना ठराविक वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शहराच्या ठिकाणी ही दुकाने असल्याने ग्रामीण शेतकऱ्यांना या वेळेत खरेदीसाठी येणे अवघड होत आहे. पालकमंत्री ॲड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत खरीप हंगाम लक्षात घेऊन ही वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे आदेश जिल्हाधिकारी यांना काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लाॅकडाऊन केले आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा देणारी दूध, भाजीपाला तसेच बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, जैविक आणि रासायनिक औषधे तसेच अवजारे आदी कृषीविषयक सेवा देणारी दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठा बंद आहेत. शेतकरी पारंपरिक पद्धतीची बियाणे साठवत नाहीत, संपूर्ण भातशेती ही कृषी सेवा केंद्रांवर अवलंबून असते. मात्र. सध्या अनेक कृषी सेवा केंद्रे बंद आहेत. विविध नामवंत कंपन्यांची भात बियाणे मिळणारी ठिकाणे बंद असल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत.
शिवाय शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये कृषी सेवा केंद्रे आहेत. त्यावर चाळीस-पन्नास गावांतील शेतकरी अवलंबून असतात. मात्र, वाहतूक व्यवस्था नसल्याने ते सकाळी ७ ते ११ या वेळेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्य उपलब्ध होणे कठीण होणार आहे. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होऊ शकतो. याची दखल घेत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्याचा अडथळारहित पुरवठा करण्यासंदर्भात आवश्यक ते निर्देश दिले असून ही केंद्रे सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवण्याच्या दृष्टीने सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या आहेत. मात्र, या आदेशांची अंमलबजावणी केवळ रायगड व सांगली जिल्हाधिकारी यांनी केली असून कृषीविषयक दुकाने उघडण्याच्या वेळेत शिथिलता दिली आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये याबाबत कार्यवाही झाली नव्हती.
अखेर गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत कृषीविषयक सेवा केंद्रांना लाॅकडाऊन काळात वेळ वाढवून देण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार आता जिल्हाधिकारी तसा आदेश काढणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील शेतकरी दुकानांची वेळ कधी वाढणार, या प्रतीक्षेत आहेत.