अखेर रिफायनरीचे घोडे बारसूच्या गंगेत न्हाणार, पंतप्रधानांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 08:08 AM2022-03-31T08:08:50+5:302022-03-31T08:09:28+5:30
जागा उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तब्बल चार लाख कोटींची गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प नाणारला होणार की बाहेर जाणार, याबाबत चार वर्षे सुरू असलेला गोंधळ मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र व पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात केलेली विधाने पाहता प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्यांनी एकत्र येऊन रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स कंपनी लि. ची स्थापना केली. या प्रकल्पासाठी कंपनीने सर्वाधिक पसंती नाणार व परिसरातील १४ गावांना दिली. मात्र तेथील विरोधामुळे आम्हीही लोकांच्या बाजूने असे म्हणत विरोध वाढत गेला. शिवसेनेकडून मतांची अपेक्षा असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१९ मध्ये यासाठीची नाणारमधील अधिसूचना रद्द केल्याने प्रकल्प होणार की नाही, हे स्पष्ट होत नव्हते. शिवसेनेने सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रकल्प बारसूमध्ये होणार हे स्पष्ट झाले आहे.
आदित्य ठाकरे सकारात्मक
शिवसेनेतील एकमेव आदित्य ठाकरे यांनी मंत्री होण्याआधी ही रिफायनरी बाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. आता कोकण दौऱ्यावर त्यांनी हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातच लोकांना हवा तेथे करु, असे सकारात्मक संकेतही दिले.
१३ हजार एकर जागा देणार
मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकल्पासाठी बारसू येथे १३ हजार एकर जागा उपलब्ध करुन देण्याचे पत्र पंतप्रधानांना पाठवले. आतापर्यंत ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली प्रकल्पाला विरोध केला जात होता. मात्र आता त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.
विरोधात मोर्चा
n तथाकथित सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली राजापुरात बुधवारी बारसूमध्ये होऊ शकणाऱ्या प्रकल्पाला विरोध करणारा मोर्चा काढण्यात आला.
n मात्र, यावेळी शिवसेना त्यात नसल्याने विरोधाचा जोर किती टिकणार, हा प्रश्नच आहे.