अखेर सावर्डेतील पाणी प्रश्न सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:30+5:302021-05-05T04:52:30+5:30
चिपळूण : गेल्या काही वर्षांपासून वेगाने वाढणाऱ्या सावर्डे येथील होडेवाडी, घसासेवाडी, कदमवाडी परिसरात पाणी पुरवठ्याची समस्या होती. गेल्या काही ...
चिपळूण : गेल्या काही वर्षांपासून वेगाने वाढणाऱ्या सावर्डे येथील होडेवाडी, घसासेवाडी, कदमवाडी परिसरात पाणी पुरवठ्याची समस्या होती. गेल्या काही वर्षांपासून येथील वाड्यांना समान दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता. यावर उपाय म्हणून या भागासाठी सावर्डे ग्रामपंचायतीने साठवण टाकी उभारली. या साठवण टाकीचे उद्घाटन झाले असून, येथील वाड्यांना आता मुबलक प्रमाणात पाणी मिळण्यास मदत झाली आहे.
सावर्डे गावात ग्रामपंचायतीच्या एकूण ४ पाणी पुरवठा योजना आहेत. दोन खासगी योजना आहेत. पाणी योजनेसाठी मुबलक पाण्याचा स्रोत पाहून तेथून पाणी उचलले जात आहे. सावर्डेत खोतवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, घसासेवाडी, चौसोपी, कदमवाडी, पवारवाडी भागात समान दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता. उंच आणि सखल भागात वाड्या वसल्याने पाणी पुरवठ्याची समस्या होती. गेल्या काही वर्षांपासून पुरेसे पाणी मिळावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्यासाठी ग्रामपंचायतीने १४वा वित्त आयोग योजनेतून साठवण टाकी उभारली. साठवण टाकीसाठी चव्हाण बंधूंनी मोफत जागा दिली. जागा मिळण्यासाठी माजी सभापती व विद्यमान सदस्या पूजा निकम यांनी प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे साठवण टाकीचा मार्ग मोकळा झाला.
ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या प्रभागातील पाणी पुरवठ्याचा अभ्यास करून त्यावर मार्ग काढल्यास पाणी टंचाईची समस्या भासणार नाही, असे मत पूजा निकम यांनी व्यक्त केले.
पूजा निकम यांच्या हस्ते साठवण टाकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, माजी सरपंच बाळा मोहिरे, सदस्य मैनुद्दीन खलपे, अंकिता सावंत, स्नेहा मेस्त्री, शरद चव्हाण, अजित कोकाटे, विजय बागवे, संदीप खेराडे, सीमा गुडेकर, समिया मोडक यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
.................................
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पाणी योजनेचे उद्घाटन पंचायत समितीच्या सदस्या पूजा निकम यांच्या हस्ते करण्यात आले.