पर्ससीन बंदीचा सर्वांनाच फटका
By admin | Published: March 17, 2016 10:58 PM2016-03-17T22:58:40+5:302016-03-17T23:34:24+5:30
मालवाहकांची गर्दी ओसरली : आर्थिक उलाढालही ठप्प
रत्नागिरी : पर्ससीन नेटधारक मच्छीमारांना १ जानेवारी ते १५ मेपर्यंत मच्छीमारीस बंदी घातल्याने येथील मिरकरवाडासह अनेक मच्छीमारी बंदरातील मोठे आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. या बंदरांवर असलेली मच्छीमार, मालवाहकांची गर्दीही ओसरली आहे. आर्थिक उलाढाल ठप्प होण्याबरोबरच मच्छीमारीवर अवलंबून असलेल्या अनेक जोडधंद्यांना याचा जबर आर्थिक फटका बसला आहे. त्यातच पर्ससीन नेटधारक मच्छीमारांनी पारंपरिक पध्दतीच्या जाळ्यांनी मच्छीमारी न करता किनाऱ्यावरच राहणे पसंत केल्याने खलाशीही बेरोजगार झाले आहेत.
जिल्ह्यातील मिरकरवाडा, हर्णै, जयगड, साखरीनाटे, राजिवडा, पूर्णगड, वरवडे, दाभोळ यासारख्या अनेक मच्छीमारी बंदरांमधील गजबज कमी झाली आहे. येथील मच्छीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळही आता एकदम कमी झाली आहे. मच्छीच्या वाहतुकीतून हजारो वाहने, छोटे टेम्पो यांना आर्थिक बळ मिळाले होते. मात्र, पर्ससीन नेटवर बंदी घातल्यानंतर या वाहनांना कामच उरलेले नाही. मच्छी वाहतुकीसाठी कर्जावर वाहने घेतलेल्यांना आता कर्जाचे हप्ते कसे भरावेत, असा प्रश्न पडला आहे. मच्छी परराज्यात नेणाऱ्या ट्रकमालकांनाही याचा आर्थिक फटका बसला आहे.
मच्छीमारीमुळे बंदरात ये-जा करणाऱ्या मच्छीमारी नौकांसाठी लागणारे पाणी टॅँकरद्वारे पुरवठा करणाऱ्यांनाही पर्ससीन मच्छीमारी बंदीची झळ बसली आहे.
त्याचबरोबर प्रत्येक बंदराच्या ठिकाणी असलेले वडापाव विक्रेते, अन्य खाद्य व्यावसायिक यांच्या व्यवसायावरही गंभीर परिणाम झाला आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यातील विविध बाजारपेठाही मच्छीमारी हंगामावरच बहुतांशी अवलंबून आहेत. मच्छीमारी व्यवसाय चांगला चालला की या बाजारपेठांमध्येही तेजी असते. मात्र, आता बाजारपेठांमध्येही त्याचा दुष्परिणाम दिसू लागल्याने व्यापारीवर्गही हवालदिल झाला आहे. मच्छीमारी व्यवसायासाठी लागणारे विविध साहित्य विक्री करणारे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. रत्नागिरीतील मिरजोळे औद्योगिक वसाहतीतील फीशमील्सनाही प्रक्रियेसाठी मच्छी मिळेनाशी झाली असून, त्यांचे कामही कमी झाले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक नेपाळी लोक आंबा बागायतींमध्ये रखवालदार म्हणून काम करतात तसेच ते मच्छीमारी नौकांवरही खलाशी म्हणून काम करतात. स्थानिकांबरोबरच कर्नाटक, केरळ येथील खलाशीही जिल्ह्यातील मच्छीमारी नौकांवर खलाशी म्हणून काम करीत आहेत. पर्ससीन नेटच्या एका नौकेवर किमान २५ ते कमाल ३० खलाशी कार्यरत असतात.
गेल्या १ जानेवारीपासून पर्ससीन नौका किनाऱ्यावरच असल्याने दर दिवसाचा खलाशांवरील २० हजार खर्च हा नौका मालकांना करावाच लागत आहे. त्यामुळे बंदरातून पर्ससीन नौका सुरक्षित स्थळी नेण्याची परवानगीही मालकांनी मत्स्य आयुक्तांकडे मागितली आहे. (प्रतिनिधी)
तीव्र प्रतिक्रिया : पारंपरिक मच्छीमार ठाम
पर्सनेटला घातलेली बंदी उठवू नये या भूमिकेवर पारंपरिक मच्छीमार ठाम आहेत. कोणत्याही स्थितीत पर्ससीनवरील बंदी उठवू नये, यासाठी त्यांचा लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक मच्छीमारांनी अत्याधुनिक मच्छीमारांच्या अतिक्रमणाखाली हलाखीचे दिवस काढल्याच्या तीव्र प्रतिक्रीयाही व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर पारंपरिक मच्छीमार आक्रमक का झाले याचा विचार पर्सनेट मच्छीमारांनी करण्याची आवश्यकता आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या सागरी क्षेत्रातील हद्दीत पर्सनेट नौकांनी मच्छीमारी केल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे.
गोवा, मुंबईचे मासे रत्नागिरीत
पर्सनेट मच्छीमारीवर राज्यात जरी बंदी असली, तरी अन्य राज्यात अशी बंदी नाही. त्यामुळे तेथील सुरमई, पापलेट व अन्य प्रकारचे मासे रत्नागिरीसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही विक्रीसाठी आणले जात आहेत. हर्णै येथील मासेही मोठ्या प्रमाणात रत्नागिरी बंदरात विक्रीसाठी येत आहेत. तरीही मच्छीची कमतरता भासत असून, मच्छीमारांच्या या भांडणात मच्छी खवय्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. एकिकडे गोव्याची मच्छी रत्नागिरीत येत असताना अन्य राज्यांतील पर्सनेट मच्छीमारी नौकांची कोकण किनाऱ्यावर घुसखोरी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.