कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे : प्रदीप प्रभुदेसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:31 AM2021-04-16T04:31:38+5:302021-04-16T04:31:38+5:30
पाचल : कोरोना रोखण्यासाठी शासनाने केलेल्या सर्व नियमांचे पालन करून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन ...
पाचल : कोरोना रोखण्यासाठी शासनाने केलेल्या सर्व नियमांचे पालन करून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन तळवडे गावचे सरपंच प्रदीप प्रभुदेसाई यांनी केले आहे. तळवडे गावात कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी राबविलेल्या विविध उपाययोजनांची माहिती पत्रकारांना देताना ते बोलत होते.
तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती भयानक होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन व आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तळवडे ग्रामपंचायतीने वाडी-वस्तीवर विविध ठिकाणी जनजागृती करण्यासाठी कंबर कसली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि व्यापाऱ्यांवर निर्बंध लागू केले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतही आपल्या स्तरावर विविध उपक्रम राबवित असल्याचे प्रभुदेसाई यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावात ठिकठिकाणी फलक लावून जनजागृती केली आहे. तसेच राज्य शासनाने लागू केलेल्या लाॅकडाऊनची माहिती देण्यात आली. यासाठी पदाधिकाऱ्यांसह सर्व ग्रामस्थही मेहनत घेत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी याकामी सहकार्य व योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
या जनजागृती उपक्रमात उपसरपंच चंद्रकांत गुरव, तलाठी विकास भंडारी, ग्रामविकास अधिकारी सुधाकर पेडणेकर, पोलीसपाटील शीतल कोटकर व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांचेही सहकार्य लाभत असल्याचे सरपंच प्रदीप प्रभुदेसाई यांनी सांगितले.