परीक्षा रद्द मात्र तरीही अभ्यास करावाच लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:46+5:302021-05-08T04:33:46+5:30
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने दहावीच्या परीक्षाच रद्द केल्या आहेत. शालेय अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणपत्रिका दिली जाणार ...
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने दहावीच्या परीक्षाच रद्द केल्या आहेत. शालेय अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणपत्रिका दिली जाणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मान्य नाही त्यांना गुणसुधार परीक्षेची संधी दिली जाणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याची परीक्षा बोर्डाकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार आहे.
गतवर्षीपासून कोरोनामुळे विविध क्षेत्रावर पडसाद उमटले. शिक्षणक्षेत्रही त्यापासून वंचित राहिलेले नाही. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष भरले नाहीत. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू झाले. मात्र, कोरोना रुग्ण वाढल्याने एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा होण्यापूर्वीच शाळा बंद पडल्या. वाढत्या कोरोना संसर्गामुळे विद्यार्थी आरोग्य हितार्थ परीक्षा रद्दचा निर्णय शासनाला घ्यावा लागला. दहावीच्याही परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, परीक्षा कधी, केव्हा होतील याबाबत मार्गर्शक सूचना अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.
दहावीच्या परीक्षा रद्द केल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान झाले आहे. याबाबत काही जागृत पालकांनी आवाज उठविला असता, ज्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मान्य नाही त्यांना गुणसुधार परीक्षेची संधी दिली जाणार आहे. मात्र, ही परीक्षा केव्हा घेणार तेही अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे परीक्षेबाबत अद्याप पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. शिवाय इच्छुक मुलांनी परीक्षा देण्यासाठी तयारी असावी म्हणून अभ्यास सुरूच ठेवला आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांमध्ये शासनाच्या पासच्या निर्णयामुळे कमालीचा आनंद आहे.
कोरोनामुळे पुढील शैक्षणिक सत्र वेळेवर सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर जून-जुलैमध्ये परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे. जर अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात आली तर मात्र परीक्षेबाबत गाफील राहिलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
प्रवेश परीक्षा
दहावीमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना मात्र अन्य कुठल्याही शाखेत अकरावीसाठी प्रवेश घेताना प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रवेश परीक्षेचे नेमके स्वरूप कसे असेल किंवा कशा घेण्यात येतील याबाबत विद्यार्थी अद्याप अनभिज्ञ आहेत. परीक्षेसाठी कदाचित दहावीच्या अभ्यासक्रमावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामुळे मुलांनी अभ्यास सुरू ठेवला आहे.
कोट घ्यावा :
शासनाने दहावीच्या मुलांची परीक्षा रद्द करून पासचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणपत्रिका दिली जाणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मान्य नाही त्यांना गुणसुधार परीक्षेची संधी दिली जाणार आहे. वास्तविक, शासनाचे एकच धोरण असणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांमध्ये संभ्रम असून, तातडीने एकच निर्णय जाहीर करावा.
- साक्षी खेडेकर, पालक