बारसूतील खोदकाम संपले, विरोधकांचे मनाई आदेश उठले

By मनोज मुळ्ये | Published: May 15, 2023 06:16 PM2023-05-15T18:16:38+5:302023-05-15T18:16:45+5:30

रत्नागिरी / राजापूर : तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम रविवारी संपले. एकूण ६६ बोअरवेल ...

Excavation in Barsu ends, opposition lifted | बारसूतील खोदकाम संपले, विरोधकांचे मनाई आदेश उठले

बारसूतील खोदकाम संपले, विरोधकांचे मनाई आदेश उठले

googlenewsNext

रत्नागिरी / राजापूर : तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम रविवारी संपले. एकूण ६६ बोअरवेल खोदल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दोन महिन्यात या माती परीक्षणाचा अहवाल येणार असून, त्यानंतरच बारसूमध्ये प्रकल्प होणार नाही हे निश्चित होणार आहे. दरम्यान हे काम आटोक्यात आल्याने रिफायनरी विरोधकांना लागू करण्यात आलेले मनाई आदेश रद्द करण्यात आले आहेत.

एप्रिल महिन्यापासून बारसू, सोलगाव परिसरातील सड्यावर रिफायनरी प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम सुरु होते. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. स्थानिकांनी या कामाला जोरदार विरोध करत ते काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही बारसूचा दौरा केला. कामात अडथळा येऊ नये म्हणून या परिसरात सुमारे २००० पोलिस तैनात ठेवण्यात आले होते.
रविवारी माती परीक्षणाचे काम संपले असून, हे काम करणाऱ्या इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड या कंपनीने मातीचे नमुने हैद्राबादच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल दोन महिन्यात येण्याची शक्यता आहे.

माती परीक्षणाचे काम आटोक्यात येत असतानाच गुरुवारी (११ मे) प्रकल्प विरोधी नेत्यांना बजावण्यात आलेले मनाई आदेश माग घेण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मनाई आदेशान्वये रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश व संचार करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला होता. हे आदेश पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या दि. ११ मे २०२३ च्या पत्राच्या अनुषंगाने मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. संबंधित रद्द आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

यांच्याविरुद्ध होते आदेश
देवाप्पा अण्णा शेट्टी उर्फ राजू शेट्टी (रा. अर्जुनवाड रोड, ता. शिरोळ जि. कोल्हापूर, खासदार व अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनार्दन गुंडू पाटील, (रा. परीते, ता. करवीर, जि. कोल्हापूर, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संघटना, कोल्हापूर), अशोक केशव वालम (रा. नाणार, ता. राजापूर), जालिंदर गणपती पाटील, (रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), स्वप्निल सीताराम सोगम (रा. पन्हळे तर्फे राजापूर, ता. राजापूर), सत्यजित विश्वनाथ चव्हाण, (रा. राम आनंदनगर हाऊसिंग सोसायटी, दहिसर पूर्व, मुंबई) यांच्याविरुद्ध हे आदेश बजावण्यात आले होते.

Web Title: Excavation in Barsu ends, opposition lifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.