बेसुमार वृक्षताेडीमुळे वीज पडण्याचे प्रकार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:22 AM2021-06-20T04:22:03+5:302021-06-20T04:22:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महाराष्ट्रात झपाट्याने कमी हाेणाऱ्या जंगलांमुळे, बेसुमार वृक्षताेडीमुळे थेट जमिनीवर वीज पडण्याचे प्रमाण वाढले आहे़ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : महाराष्ट्रात झपाट्याने कमी हाेणाऱ्या जंगलांमुळे, बेसुमार वृक्षताेडीमुळे थेट जमिनीवर वीज पडण्याचे प्रमाण वाढले आहे़ यामध्ये बळी जाण्याच्या प्रमाणातही गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे़ राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत काेकणातील डाेंगर आणि वनसंपदेमुळे या ठिकाणी वीज पडण्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती पुणे येथील आयआयटीएमचे डाॅ़ सुनील पवार यांनी दिली़
इंडियन मेट्राेलाॅजिकल साेसायटीतर्फे पत्रकारांसाठी ‘हवामानशास्त्र आणि हवामान सेवांमध्ये अलीकडील प्रगती’ यावर तीन दिवसीय ई-कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यशाळेत सुनील पवार यांनी माहिती दिली. या कार्यशाळेला डाॅ. के. एस. हाेसाळीकर, नीलेश वाघ, डाॅ. सचिन घुडे, डाॅ. ए. के. सहाई, शुभांगी भुते, डाॅ. जे. आर. कुलकर्णी यांनीही सहभाग घेतला हाेता. यावेळी डाॅ. पवार यांनी सांगितले की, ढगांमध्ये आणि थेट जमिनीवर वीज पडते. वर्षभरात जेवढी वीज एका घरात वापरली जाते तेवढी क्षमता आकाशातून काेसळणाऱ्या विजेच्या एका झटक्यामध्ये असते. वीज पडून जगभरात तब्बल २०,००० लाेक मृत्युमुखी पडतात, असे पवार यांनी सांगितले.
उंच झाड, टाॅवर आणि टेकडी या ठिकाणी वीज पडते. सध्या जंगलाचा माेठ्या प्रमाणात हाेणारा ऱ्हास यामुळे वीज थेट जमिनीवर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मराठवाडा, विदर्भ या भागात जंगलाचे प्रमाण कमी असल्याने या ठिकाणी वीज पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत काेकणात असणारे डाेंगर, जंगल यामुळे वीज पडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे, असेही ते म्हणाले.
--------------------------
‘दामिनी ॲप’ देणार माहिती
हवामान खात्याने विजांची माहिती मिळण्यासाठी ‘दामिनी ॲप’ तयार केले आहे. या ॲपद्वारे वीज काेठे पडते, वीज पडल्यावर कशी काळजी घ्यावी याची माहिती दिली जाते. हे ॲप २० ते ४० किलाेमीटर अंतरावर वीज पडण्याचा धाेका असल्यास माहिती देते. या ॲपमध्ये अजून काम सुरू असून, त्याद्वारे वीज पडण्याआधी ३० मिनिटे आधी माहिती मिळणे शक्य हाेणार आहे.
-------------
दुपारच्या वेळेत वीज पडण्याचे प्रकार अधिक
महाराष्ट्रात दुपारी १-२ वाजल्यानंतर वीज पडण्यास सुरुवात हाेते. त्यानंतर सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान हे प्रमाण वाढते. याच काळात फिरतीवर असणारे नागरिक, कार्यालयातून बाहेर पडणारे नागरिक यांना जास्त धाेका संभवताे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. वीज पडून मृत्यू हाेण्यामध्ये पुरुषांचे प्रमाण ८६ टक्के इतके आहे. याचे कारण बाहेर काम करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.
--------------------------
काेणती काळजी घ्यावी?
वीज पडत असल्याचे कळल्यास माेकळ्या जागेत राहू नये. तसेच झाडाखाली उभे राहू नये, त्याऐवजी झाडापासून ५ ते ६ फुटांच्या अंतरावर बसून राहावे म्हणजे धाेका पाेहाेचणार नाही. झाडाखाली उभे राहिल्यास वीज थेट झाडाच्या फांदीवर पडून माणसाच्या अंगावर पडू शकते. चालताना दाेन्ही पायांमध्ये अंतर ठेवू नये.