दापोलीत मृतावस्थेत कावळे आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 02:08 PM2021-01-08T14:08:59+5:302021-01-08T14:10:16+5:30
Dapoli Bird Flu Ratnagiri- राज्यात बर्ड फ्लू येण्याची चिंता व्यक्त होत असतानाच गुरुवारी दापोली शहरातील डंपिंग ग्राऊंडमध्ये १० ते १५ कावळे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.aराज्यात बर्ड फ्लू येण्याची चिंता व्यक्त होत असतानाच दापोली शहरातील डंपिंग ग्राऊंडमध्ये १० ते १५ कावळे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
दापोली : राज्यात बर्ड फ्लू येण्याची चिंता व्यक्त होत असतानाच दापोली शहरातील डंपिंग ग्राऊंडमध्ये १० ते १५ कावळे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
सध्या राज्यात बर्ड फ्लूचे संकट उभे राहिले आहे. जयपूरमध्ये बर्ड फ्लूमुळे कावळे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार पुढे आला आहे. बर्ड फ्लूबाबत चिंता वाढली असतानाच दापोलीतील डंपिंग ग्राऊंडमध्ये कावळे मृतावस्थेत आढळले आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
या कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दापोलीतील सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे यांनी या कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी घेऊन पाठविले आहेत. शहर परिसरात मृतावस्थेत पक्षी आढळल्यास त्यांना हात लावू नये, असे आवाहन डॉ. मुकुंद लोंढे यांनी केले आहे.
दरम्यान, शहरातील आजूबाजूच्या परिसरात अजून काही पक्षी मृत्युमुखी पडले आहेत का, याचा शोध पक्षिप्रेमी घेत आहेत.
दापोली शहर परिसरात कावळे मृत्युमुखी पडल्यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नगरपंचायत योग्य ती खबरदारी घेईल. कुठेही पक्षी मृत्युमुखी पडल्याचे आढळल्यास त्याला हात न लावता नगरपंचायतीला कळवावे. नगरपंचायत या पक्ष्यांची योग्य ती विल्हेवाट लावेल.
- महादेव रोडगे, मुख्याधिकारी
नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. डंपिंग ग्राऊंड परिसरात टाकण्यात आलेल्या एखाद्या पदार्थामुळे पक्ष्यांना विषबाधा झाली असण्याची शक्यता आहे. बर्ड फ्लूसारखा आजार नसावा. परंतु, तपासणी अहवाल येईपर्यंत कोणीही काळजी करू नये.
- प्रवीण शेख, नगराध्यक्ष
अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं