रत्नागिरी: गुहागरातील वेळणेश्वर येथे बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 06:15 PM2022-07-04T18:15:43+5:302022-07-04T18:16:31+5:30
बॉम्ब शोध व नाश पथकाने सुरक्षितस्थळी या वस्तू निकामी केल्या
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी रविवारी (३ जून) सकाळी बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरीतील बाॅम्ब शाेध नाशक पथक आणि श्वान पथकाच्या साहाय्याने दुपारी ३ वाजता ती वस्तू माेकळ्या जागेत निकामी करण्यात आली.
वेळणेश्वरचे माजी सरपंच नवनीत ठाकूर यांना सकाळी ८ वाजता वेळणेश्वर समुद्रकिनारी एका बरणीत बॉम्बसदृश पाच गोळे दिसले. याबाबत त्यांनी तत्काळ गुहागर पोलीस स्थानकाला माहिती दिली. गुहागर पाेलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर रत्नागिरी येथील बॉम्ब शोध व नाशक पथकाला बोलावण्यात आले.
बॉम्ब शोध व नाश पथकात श्वान ‘राणा’ याच्यासह सहायक पाेलीस निरीक्षक चित्रा मढवी, पोलीस नाईक प्रीतेश शिंदे, पोलीस नाईक अमित रेवाळे, पोलीस शिपाई आशिष रहाटे, सुमित पडेलकर, श्वान हस्तक पोलीस नाईक रितेश वायंगणकर, मयूर कदम, चालक सहायक पोलीस फौजदार मंगेश कदम, चालक पोलीस हवालदार संभाजी घुगरे यांचा समावेश हाेता.
हे पथक दुपारी तीन वाजता वेळणेश्वर येथे दाखल झाले. या पथकाने सुरक्षितस्थळी या वस्तू निकामी केल्या. याबाबत नवनीत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले की, दहा वर्षांपूर्वी वेळणेश्वर समुद्रकिनारीच अशा प्रकारची वस्तू सापडली होती.
या बॉम्बसदृश वस्तू ईकरोस कंपनीचे ५ रेड पॅराशूट सिग्नल डिवाइस आहेत. याचा वापर शिपवर इमर्जन्सीसाठी तसेच ट्रेनिंग व रेस्क्यू ऑपरेशनसाठी केला जातो. मोठ्या जहाजावरती इमर्जन्सीसाठी याचा वापर झाल्यानंतर हे गोळे समुद्रकिनारी भरतीच्या वेळी आले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
असा होतो वापर
एखादे जहाज खोल समुद्रात जेव्हा भरकटते व सिग्नल यंत्रणा काम करत नाही, अशा वेळी आपल्या परिसरातील जहाजावरील कॅप्टनना आपण भरकटले आहोत, अशा प्रकारचे सूचना देण्यासाठी अशा प्रकारे डिव्हाईसचा वापर केला जातो. वर आकाशात हे गोळे उडवले जातात. त्यांचा आवाज व प्रकाश यातून दुसऱ्या लोकांना एखादे जहाज भरकटले आहे, धोक्यात आहे याची माहिती मिळून मदत मिळते.