असगोलीला वगळल्याने भाजपचा जोर वाढला

By admin | Published: September 22, 2016 11:46 PM2016-09-22T23:46:49+5:302016-09-23T00:38:04+5:30

गुहागर नगरपंचायत : विनय नातू यांच्या प्रयत्नांना यश

Excluding Asgoli, BJP's thrusts up | असगोलीला वगळल्याने भाजपचा जोर वाढला

असगोलीला वगळल्याने भाजपचा जोर वाढला

Next

संकेत गोयथळे -- गुहागर नगरपंचायतीतून असगोली गाव वगळण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली असून, लवकरच याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील राजकीय वादामध्ये पहिल्यांदाच भाजपने जोर मारला असून, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटतील, अशी चर्चा रंगू लागली आहे.
नगरपंचायत स्थापनेसाठी गुहागर शहराची लोकसंख्या कमी पडत असल्याने दोन हजार लोकसंख्या असलेले लगतचे असगोली गाव नगरपंचायतीला जोडण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मांडला. मंत्रीपदाच्या जोरावर ६ आॅक्टोबर २०१२ रोजी गुहागर नगरपंचायत स्थापन झाली. याचवेळी असगोली गावामध्ये येणाऱ्या मांडके बिल्डर्सच्या प्रोजेक्टसाठी नगरपंचायत स्थापन होत असल्याची चर्चा होती. याला ग्रामस्थांनी कडाडून विरोधही केला. अखेर नगरपंचायत स्थापन होऊन असगोली गावाचाही त्यात समावेश करण्यात आला. भाजपनेही राजकीय खेळी करत असगोलीमधून माजी सरपंच गजानन वेल्हाळ यांच्यासह गुहागर शहरातील उमेदवार देऊन राष्ट्रवादीवर उलटी खेळी करण्याचा प्रयत्न केला.
यानंतरही ग्रामस्थांनी विरोध करत लोकवर्गणी जमा करुन मुंबई उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल केले, याची अद्याप सुनावणी झालेली नाही. सत्ता बदलानंतर माजी आमदार भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी वरच्या स्तरावर हालचाली सुरु केल्या. अखेर याला यश आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर सही केली आहे. आता हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे जाऊन याबाबतची अधिसुचना लवकरच जारी होईल, असे सांगितले जात आहे. काही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तर असगोलीमध्ये घराघरामध्ये जाऊन हे आम्ही करुन दाखवले, असे सांगून राजकीय श्रेय घेण्याची सुरुवातही केली आहे.
भविष्यात काही महिन्यांवर गुहागर पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. नगरपंचायत स्थापन झाल्याने शहरातील जनतेच्या नियमांच्या गुंत्यामुळे वाढलेला प्रशासकीय अडचणी लक्षात घेता भाजपला याचा फायदा होईल, असे वाटत आहे. यातच भाजपचा एकतर्फी वर्चस्व असलेल्या असगोली गावाच्या मतदानाचा पंचायत समितीच्या निवडणुकीतही फायदा होईल, असे राजकीय गणित आहे. भविष्यात या बदलत्या घडामोडीमुळे प्रत्यक्ष कोणाला फायदा होईल, ही नंतरची प्रक्रिया असली तरी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी नगरपंचायत स्थापनेसाठी असगोली गावाचा समावेश करून चांगलीच बाजी मारली. मंत्रीपदी असताना नगरपंचायत स्थापन झाल्याने आपल्या अधिकारात स्थापनेपूर्वी व त्यानंतर काही कोटींचा निधी मंजूर केला. याचवेळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरांना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे प्रस्तावित होते. मात्र, यानुसार गुहागर नगरपंचायत स्थापन होण्यासाठी आणखी काही वर्षाचा कालावधी लागला असता व त्यावेळी मंत्रीपद असेल नसेल हा विचार करुन आधीच नगरपंचायत स्थापन करुन एकप्रकारे राजकीय बाजी मारली. गेली काही वर्षे मूग गिळून गप्प बसलेले डॉ. विनय नातू व भाजप मंडळींना गुहागर नगरपंचायतीमधून असगोली गाव वगळल्याने सत्तेचा राजकीय रिचार्ज मिळून पंचायत समिती निवडणुकीवर याचे पडसाद उमटताना दिसतील.

Web Title: Excluding Asgoli, BJP's thrusts up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.