ग्रंथ वाचन करून ज्ञानाच्या कक्षा विस्तारा : दादा इदाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:26+5:302021-06-11T04:22:26+5:30
मंडणगड : माणसाची बौध्दिक प्रगती ही ग्रंथाने अधिक प्रमाणात होत असते. आचार, विचार, संस्कार हे समृध्द होत असतात. म्हणून ...
मंडणगड : माणसाची बौध्दिक प्रगती ही ग्रंथाने अधिक प्रमाणात होत असते. आचार, विचार, संस्कार हे समृध्द होत असतात. म्हणून ग्रंथांना आपल्या जीवनामध्ये विशेष महत्त्व दिले पाहिजे. अधिकाधिक ग्रंथ वाचन करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत दादा इदाते यांनी व्यक्त केले.
लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कै. विजया सदाशिव पाटणे ग्रंथालयाच्या विस्तारित कक्षाचा उद्घाटन सोहळा पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादा इदाते यांच्या हस्तेे फित कापून व नामफलकाचे अनावरण करून या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. विशेष प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी अनुसूचित जाती मोर्चाचे सदस्य आनंद व्यंकट शिंदे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब आयरे, कार्याध्यक्ष श्रीराम इदाते, कार्यवाह प्रा. सतीश शेठ, सहकाेषाध्यक्ष रवींद्र मिश्रा, संपदा पारकर, प्रेम पारकर, विवेक इदाते, गिरीश जोशी, अजित आंब्रे, विश्वदास लोखंडे, काजल लोखंडे, आदेश मर्चंडे, संतोष चव्हाण, सुनील मेहता, कुंबळे हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील घाणेकर, नारायण स्वामी, डाॅ. पेंडसे उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डाॅ. सुभाष सावंत यांनी केले. दादा इदाते म्हणाले की, कोविड महामारी ही एक संधी आहे. त्यातून बरेच शिकण्यासारखे असताना आपण भयभीत झालो आहोत. आपले कसे होणार, या विवंचनेत सापडलेल्या समाजाला आपण धीर दिला पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ, असे सांगितले.
ग्रंथालयाला अनुदान मिळवण्यासाठी चिपळूण येथील प्रमोद शिंदे व अनिल कलकुटकी यांनी सहकार्य केले. यावेळी आनंद शिंदे यांनी पंचक्रोशीतील सर्वांना सोबत घेऊन दादांनी समाजसेवेचा जो वसा घेतलेला आहे, तो पाहून मी अक्षरश: भारावून गेलो आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन डाॅ. शैलेश भैसारे यांनी केले तर उपप्राचार्य डाॅ. वाल्मिक परहर यांनी आभार मानले.
----------------------------------
लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कै. विजया सदाशिव पाटणे ग्रंथालयाच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते यांच्याहस्ते करण्यात आले़