अनुभवाचा उपयोग मायभूमीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2016 09:52 PM2016-05-17T21:52:26+5:302016-05-18T00:32:34+5:30
अमित घस्ते : भविष्यात कोकणातील समुद्रात काम करण्याची अतीव इच्छा
देवरूख येथील निवृत्त गटविकास अधिकारी प्रकाश घस्ते आणि योगाशिक्षिका शीला घस्ते यांचे सुपुत्र अमित घस्ते यांनी खडतर प्रयत्न आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर लहान वयातच कॅप्टन (मास्टर) ची पदवी मिळवली आहे. कमी वयात ही पदवी मिळविणारे ते पहिले देवरूखवासीय आहेत. या सर्व प्रवासात त्यांना साथ मिळाली ती आई, वडील, पत्नी आरती, बहीण मानसी (रोशनी) आणि सर्व मित्रमंडळींची! अमित घस्ते यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कुठेही माघार न घेता लहानपणापासूनचे जतन केलेले स्वप्न पूर्ण केले आहे. आपल्या या अनुभवाचा उपयोग आपल्या मायभूमीसाठी व्हावा, आपल्या जिल्ह्याचे नाव सर्वदूर पोहोचवावे, अशी त्यांची आत्यंतिक इच्छा आहे.
प्रश्न : या क्षेत्रात यावेसे का वाटले ?
उत्तर : माझे शालेय जीवन देवरूख येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. शाळेत असताना सर्व खेळात मी अग्रेसर असे. राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतही मी खेळलो आहे. त्यामुळे साहसी वृत्ती लहानपणापासूनच होती. पुढे अकरावी आणि बारावी (विज्ञान) मी रत्नागिरीच्या गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातून केले. याच दरम्यान दापोलीतील माझे मामा रमण गांधी हे मर्चंट नेव्हीमध्ये होते. त्यामुळे साहजिकच माझ्यात या क्षेत्राबद्दल आकर्षण निर्माण झाले होते. त्यासाठी आईची परवानगी मिळणार नाही, म्हणून बारावीनंतर नेव्ही पात्रता परीक्षेसाठी मी गुपचूप अर्ज भरला. सुदैवाने त्यात माझी निवडही झाली. पण, माझी भीती खरी ठरली, मला घरातून परवानगी मिळाली नाही.
प्रश्न : पुढचा प्रवास कसा झाला ?
उत्तर : त्यानंतर मग आपल्याला या क्षेत्रात जाण्याची संधी मिळणार नाही, असा विचार करून मी लोणेरे (महाड) येथे इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. मात्र, जात प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने हा अभ्यासक्रम मला अर्धवट सोडावा लागला. पुन्हा मला सागरी क्षेत्र खुणावू लागले. शेवटचा प्रयत्न म्हणून मी माझ्या आई - वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि माझा हा प्रयत्न यशस्वी झाला. त्यांनी मला परवानगी दिली. माझा आनंद गगनात मावेना. मी २००२ साली मर्चंट नेव्ही प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि इथूनच खऱ्या खडतर प्रयत्नांना सुरूवात झाली.
प्रश्न : कॅप्टन पदापर्यंतचा प्रवास कसा झाला ?
उत्तर : मर्चंट नेव्हीच्या प्रशिक्षणात मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. त्यावेळी माझा सत्कार झाला तो त्या वेळचे जहाजभवन मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅ. सुधीर नाफडे यांच्या हस्ते. योगायोगाने तेही देवरूखचेच सुपुत्र असल्याने त्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना मला विशेष आनंद झाला. २००३ साली मर्चंट नेव्हीत कामाला सुरूवात केली. याच कालावधीत कठीण कामे करतानाच खडतर परिस्थितीत जहाजावर अभ्यासही सुरू ठेवला. तीन वर्षांचे प्रशिक्षण घेऊन २००७ साली द्वितीय श्रेणी अधिकारी (सेकंड आॅफिसर) ही पदवी मिळवली. ‘इंटरनॅशनल मेरिटाईम सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साऊथहॅम्पनमधून मीही पदवी घेतली. त्यानंतर माझा प्रवास पुढेच सुरू राहिला. सेकंड आॅफिसर म्हणून काम करत जवळजवळ १८ महिन्यात विविध देशात प्रवास केला. कप्तान होण्यासाठी अभ्यासाबरोबर परीक्षेची पूर्वतयारी केली. त्यानंतर २०१२ साली जिद्दीने प्रयत्न करून मी ‘चीफ आॅफिसर’ ही मर्चंट नेव्हीतील पदवी मिळवली आणि मुलाखतीतही पास झालो. आता स्वप्न होते ते ‘मास्टर डिग्री’चे. ते पूर्ण करण्यासाठी तर तनमनधनाने प्रयत्न करून अखेर २०१५ साली यश मिळविले आणि कॅप्टन (मास्टर) ही पदवीही मिळवली. अर्थात हे करताना मी काटकसर कशी करायची, हे शिकलो. परदेशातील शिक्षण महागडे असते, त्यामुळे काही वेळा एकदाच जेवून तर कधी पार्ट टाईम नोकरी करून शिक्षण पूर्ण करावे लागले. पण ज्यावेळी मी मास्टर कॅप्टन झालो, त्यावेळी माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांनाच अधिक आनंद झाला होता. मर्चंट नेव्हीच्या कार्यक्रमात मला ही पदवी नुकतीच बहाल करण्यात आली आहे. याचबरोबर कोणत्याही जहाजावर या पदाचे नेतृत्व करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
प्रश्न : कॅप्टन (मास्टर)साठी कुणाकुणाचा पाठिंबा मिळाला ?
उत्तर : मला डिग्री मिळवण्यासाठी आर्थिक बाबही महत्त्वाची होती. याच दरम्यान माझे वडील सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी कुठलाही विचार न करता निवृत्तीनंतरची सारी पूँजी माझ्या या शिक्षणासाठी समर्पित केली. त्यामुळेच माझे कॅप्टन होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. तसेच माझी आई, वडील, पत्नी, बहीण, नातेवाईक यांनी वेळोवेळी मला पाठिंबा देऊन माझे मनोबल वाढवले म्हणूनच माझा इथवरचा प्रवास होऊ शकला.
प्रश्न : आतापर्यंत कोणकोणते देश फिरलात ?
उत्तर : जहाजावर सेवा करताना आतापर्यंत आॅस्टे्रलिया, न्युझीलंड, युरोप, अमेरिका, जपान, रशिया, चीन आदींसह अनेक देशांत भ्रमंती केली आहे. जगातील सर्व मुख्य बंदरांना भेटी दिल्या आहेत. वेगळ्या संस्कृतीची अनेक माणसे भेटली. अनेक अविस्मरणीय आठवणी माझ्या गाठीशी आहेत.
प्रश्न : काही अविस्मरणीय प्रसंग सांगता येतील ?
उत्तर : हो! पुष्कळ आहेत. करिअरच्या सुरुवातीच्या काळातच समुद्रातील भयंकर वादळांना सामोरे जावे लागले. यावेळी माझे जवळचे दोन मित्र जहाज सोडून गेले ते पुन्हा आलेच नाहीत. पण मी कधीच विचलित झालो नाही. याही पेक्षा भयानक आठवण माझ्या डोळ्यासमोर घडली. जहाजावरील एक व्यक्तीच्या अंगावर माल (कारगो) पडल्याने तिचे तुकडे तुकडे झाले. आम्ही ते तुकडे अक्षरश: फावड्याने गोळा केले. हा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो.
महत्त्वाची भीती होती ती म्हणजे समुद्री चाच्यांची. सोमालियातील समुद्रीचाच्यांनी खूप वेळा जहाजबंदी बनवण्याचा प्रयत्न केला. जहाजावर गोळीबार केला. मात्र, ईश्वरी कृपेने यातून सहीसलामत बाहेर पडलो. सर्वच देशांतील लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. आठवणींची शिदोरी मिळाली.
प्रश्न : भविष्यात काय करावेसे वाटते ?
उत्तर : खरं सांगायचं, तर मला माझ्या कोकणाच खूप वेड आहे. त्यामुळे भविष्यात कोकणातील समुद्रात काम करण्याची संधी मिळाली तर काम करायला आवडेल, जेणेकरून माझ्या अनुभवाचा उपयोग आपल्याच मायभूमीसाठी करता येईल, इथल्या युवा पिढीला मार्गदर्शन करता येईल. माझ्या जिल्ह्याचे नाव देशी, पदरेशी पोहोचावे, यासाठी मला प्रयत्न करायचा आहे.
- सचिन मोहिते