मातीच्या धरणाची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 06:39 PM2021-04-08T18:39:23+5:302021-04-08T18:40:59+5:30
Dam Khed Ratangiri-मातीच्या धरणांची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात सुरू केला आहे. तालुक्यातील कोंडिवली धरणाच्या गळती लागलेल्या भिंतीवर जिल्ह्यातील पहिला प्रयोग सुरू करण्यात आला आहे.
खेड : मातीच्या धरणांची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात सुरू केला आहे. तालुक्यातील कोंडिवली धरणाच्या गळती लागलेल्या भिंतीवर जिल्ह्यातील पहिला प्रयोग सुरू करण्यात आला आहे.
जुलै, २०१९ मध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मातीचे धरण फुटण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील कोंडिवली येथील धरणाला गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरू असते. धरण फुटीच्या छायेखाली ग्रामस्थांना वावरावे लागते. या धरणाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने दिली आहेत, तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरण फुटीची शक्यता फेटाळून लावली होती. मात्र, धरणाच्या भिंतीची दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्ह्यातील सर्वच मातीच्या धरणांची पाहणी करून शासनाला अहवाल देण्यात आला होता.
सद्यस्थितीत कोंडिवली धरणासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंग तंत्रज्ञान वापरून दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. यासाठी शासनाने ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. बेंटोनाइट या मातीच्या पावडरचा वापर या धरण दुरुस्तीसाठी करण्यात येणार आहे. यासाठी धरणाच्या भिंतीला वरील बाजूने १० ते २५ मीटर खोल छिद्र पाडून यामध्ये पाणी टाकून बेंटोनाइटचे जाडसर मिश्रण प्रेशरने सोडण्यात येते. धरणाच्या भिंतीत अंतर्गत असलेली छिद्रे या मिश्रणाने भरली जाऊन पाण्याची गळती रोखण्यात मदत होते. या पद्धतीने सुमारे ७० टक्के पाण्याची गळती रोखली जाईल, असा अंदाज ठेकेदार कंपनीचे राहुल पाटील यांनी व्यक्त केला. या तंत्रज्ञानाने मातीच्या धरणांची काही प्रमाणात गळती रोखली जाईल, तर भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या ग्रामस्थांनाही यातून थोडासा दिलासा मिळेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
बेंटोनाइट ग्राउंटिंगमुळे मातीच्या भिंती असलेल्या धरणांची पाणी गळती रोखण्यासाठी कोंडिवली येथे काम सुरू करण्यात आले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे छिद्र असलेल्या धरणाची भिंत भक्कम होईल, सुरक्षित होईल, तसेच पाण्याची गळती रोखण्यास निश्चितच मदत होईल.
- गोविंद श्रीमंगले,
पाटबंधारे उपअभियंता, खेड