वास्तवता स्पष्ट करणारे ‘काळोख देत हुंकार’

By Admin | Published: November 18, 2014 09:42 PM2014-11-18T21:42:58+5:302014-11-18T23:28:55+5:30

राज्य नाट्य स्पर्धा : पोट पिळवटणारी गरिबी रंगमंचावर...

Explaining the reality, 'giving up the darkness' | वास्तवता स्पष्ट करणारे ‘काळोख देत हुंकार’

वास्तवता स्पष्ट करणारे ‘काळोख देत हुंकार’

googlenewsNext

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी --रोजगार मिळत नाही, त्यामुळे गरिबीने पोळलेल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी भुकेने व्याकुळ झालेल्या मुलांना दोन घास खाऊ घालण्यासाठी स्वत:चे शील विकणारी महिला. रोजगार मिळावा, यासाठी पुलाला बळी देण्याकरिता स्वत:चे तान्हे मूल विकण्यासाठी तयार होणारे गरीब कुटुंब तसेच समाजातील मुकादमासारख्या लोकांच्या छळाने हैराण झालेल्या पीडित कुटुंबाचे किंबहुना समाजातील धगधगणारी वास्तवता ‘काळोख देत हुंकार’ या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न महाकाली रंगविहार, नाणीजच्या कलाकारांनी केला. कलाकारांनी केलेले उत्कृष्ट सादरीकरण प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारे ठरले.
रंगमंचाचा पुरेपूर वापर करून उभारलेल्या झोपड्या, झोपड्यातील गरिबीचे यथार्थ दर्शन दाखविण्यात येत होते. झोपड्यांच्या मागे पूल उभारण्याचे चित्रण सादर करण्यात आले. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आदी सर्व बाबतींत नाटक ठीकठाक होते. शिरमी व नारबा आणि भुत्या व तानी ही दारिद्र्यात खितपत पडलेली दोन कुटुंब. पुलाच्या कामावर जाणाऱ्या नारबा (दीपक कीर) आठवड्याला पगार झाल्यानंतर दारूवर पैसे उधळायचा. पत्नी (शिरमी) मात्र मुलांच्या शिक्षणाची, लग्नाची स्वप्ने पाहात नवऱ्याची वाट पाहते. दारू ढोसून आलेल्या नवऱ्याला चार गोष्टी समजावून स्वत:ला काम मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त करते. तानी (निर्मला टिकम) व भुत्या (प्रभाकर मयेकर) कुटुंबाला अपत्य नाही. पत्नीच्या आजारणासाठी पैसा हवा म्हणून कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणारा भुत्या देवभोळा, तर तानी मात्र पुलाच्या बांधकामावर मजूरी करून पोट भरत असते. जुम्मन चाचा (नीलेश कोतवडेकर) हे पात्र मात्र दोन्ही कुटुंबातच नव्हे तर गावकऱ्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करते.
मुकादम (नीलेश कोतवडेकर) प्रत्येक मजुराच्या मजुरीतील पैसे कापून घेतो. गरिबांवर अन्याय करणारा, पुलासाठी बळी देण्याची भाषा करणारा, मजुरीची याचना करणाऱ्या शिरमीला गैरवर्तनासाठी भाग पडतो. राधी (भक्ती सुतार), नाम्या (स्वयंम् पोवार) ही छोटी बालके रंगमंचावर वावरताना दाखविली आहे. मुकादम शिरमीला रस्त्यावरच्या कुत्रीप्रमाणे अभिलेखतो. त्यावेळी तानीच्या प्रतिकाराची भाषा अप्रभावी वाटली. शिरमीचा अभिनय अजूनही प्रभावी होणे गरजेचे होते. शिवाय नारबादेखील पत्नीच्या अब्रूचे धिंदवडे काढणाऱ्या मुकादमासमोर गप्प बसणे मागाहून क्रोधीत होणेदेखील खटकले.
प्रा. दिलीप परदेशी यांनी काळोख देत हुंकार या दोन अंकी नाटकात समाजाची वास्तवता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दीपक कीर यांनी दिग्दर्शन बऱ्यापैकी केले आहे. परंतु पूल पडल्यानंतर बराच वेळ रंगमंचावरील ‘ब्लॅकआऊट’चे कारण मात्र उमगले नाही. नाटक सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाला. दहा ते बारा मिनिटानी वीजपुरठा सुरळीत झाला. परंतु कलाकारांनी लाईट आल्यानंतर अभिनय सुरू केला.
मुलांना दोन घास मिळावेत, यासाठी बंगल्यावर काम करून स्वत:चे शरीर विकणाऱ्या शिरमीला धीर देणारी तानी, भुत्या व जुम्मन चाचादेखील परिस्थितीने गांजल्यामुळे घेतलेला निर्णय चुकीचा नसल्याचे सांगितले.
अखेर गावाला रोजगार मिळावा, यासाठी स्वत:चे तान्हे बाळ तीन हजार रुपयांना विकण्यास शिरमी आणि नारबा तयार होतात. परंतु भुकेने आजारी पडलेले बाळ अखेर मुत्यूमुखी पडते. ‘काळोख देत हुंकार’ या नाटकातून समाजाचे वास्तव चित्रण मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. तसेच रंगमंचावर नाटक सादर करण्यात संस्थेचा प्रयत्नही यशस्वी ठरला आहे.

Web Title: Explaining the reality, 'giving up the darkness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.