लोटे औद्योगिक वसाहतीत पुन्हा स्फोट, १० कामगार होरपळले; वसाहत बनतेय मृत्यूचा सापळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:49 PM2022-11-14T12:49:48+5:302022-11-14T12:50:11+5:30
काही महिन्यांपूर्वी येथील एका मोठ्या रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन पाचजणांचा बळी गेला होता.
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास स्फोटाने हादरली. औद्योगिक वसाहतीतील डीवाइन रासायनिक कंपनीत सॉलवंट रसायनाने पेट घेतल्याने आग लागून हा स्फोट झाला. यामध्ये १० कामगार होरपळले आहेत. जखमींपैकी सातजणांची प्रकृती गंभीर असून, त्यापैकी पाचजणांना ऐरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अन्य जखमींवर चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोटे औद्योगिक वसाहतीतील डीवाइन रासायनिक कंपनी २००७ पासून कार्यरत आहे. कंपनीत लेदर उत्पादनाबरोबरच औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या रसायनाचे उत्पादन घेतले जाते. रविवारी सकाळच्या पाळीत कारखान्यात फेब्रिकेशनचे काम सुरू असताना इलेक्ट्रिक वेल्डिंगच्या पडलेल्या ठिणगीमुळे कंपनीतील सॉलवंट केमिकलने पेट घेतला आणि कारखान्यात धमाका झाला. या दुर्घटनेत कारखान्यात कार्यरत असलेले दहा कामगार होरपळून निघाले. जखमींमध्ये घाणेखुंट, मुसाड, लोटे येथील कामगारांचा समावेश आहे. त्यातील सातजणांची प्रकृती गंभीर असून, पाचजणांना ऐराेली येथे दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित जखमींवर चिपळुणातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
स्फोटाच्या आवाजाने अन्य कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी डीवाइन कंपनीकडे धाव घेतली. व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती देतातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेनंतर डीवाइन कंपनीच्या बाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवून कंपनीच्या परिसरात कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला होता.
वसाहत बनतेय मृत्यूचा सापळा
काही महिन्यांपूर्वी येथील एका मोठ्या रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन पाचजणांचा बळी गेला होता. त्याआधीही येथील कारखान्यांमध्ये कामगारांचे वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये बळी गेले आहेत. मात्र, कारखाना व्यवस्थापनाकडून अपघात होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे लोटे औद्योगिक वसाहत कामगारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.
यापूर्वीच्या दुर्घटना
- २०१० - व्ही. व्ही. सी. फार्मा कंपनी सुरू असताना स्फाेट. व्यवस्थापकाचा बळी.
- ११ जानेवारी २०२० - व्ही. व्ही. सी. फार्मा कंपनीला आग. (कंपनी बंद)
- ७ मार्च २०२० - नंदादीप केमिकल कंपनीत स्फाेट.
- २० सप्टेंबर २०२० - एक्सल इंडस्ट्रीजमध्ये स्फाेट.
- जानेवारी २०२१ - दुर्गा फाईन कंपनीत स्फाेट.
- जानेवारी २०२१ - लासा सुपरजेनेरिक (जुनी उर्धवा केमिकल)च्या घनकचऱ्याला आग.
- २०२१ - श्रेयस इंटरमिडीएटस (आताची केसर पेट्राे)च्या गाेडावूनला आग.
- १५ मार्च २०२१ - सुप्रिया लाईफसायन्स कंपनीत आग, दाेन कामगार भाजले.
- २० मार्च २०२१ - घरडा केमिकल कंपनीत स्फाेट, पाच कामगारांचा मृत्यू.
- १९ एप्रिल २०२१ - समर्थ इंजिनअरिंग कंपनीत स्फाेट व आग, सहा कामगारांचा मृत्यू.
- २९ एप्रिल २०२१ - एमआर फार्मा कंपनीत आग.