हापूसची निर्यात २0 टक्केच
By admin | Published: May 27, 2016 11:21 PM2016-05-27T23:21:31+5:302016-05-27T23:21:53+5:30
फक्त १०० टन आंबाच परदेशी बाजारपेठेपर्यंत पोहोचला आहे. कमी पर्जन्यवृष्टीमुळे पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे उत्पादन घटले.
रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन घटले आणि त्याचा परदेशी निर्यातीला मोठा फटका बसला आहे. राज्यभरातून एक हजार टन आंबा उत्पादनाचे उद्दिष्ट असताना केवळ ६०० टन आंबा महाराष्ट्रातून पाठवण्यात आला. कोकणातून५०० टन हापूस निर्यातीचे उद्दिष्ट असताना फक्त १०० टन आंबाच परदेशी बाजारपेठेपर्यंत पोहोचला आहे.
कमी पर्जन्यवृष्टीमुळे पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे उत्पादन घटले. गतवर्षी अवकाळी पावसामुळे आंबा पिकावर परिणाम झाला होता. यावर्षी पीक चांगले होईल अशी अपेक्षा असताना आंबा बागायतदारांची निराशा झाली. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत हवामानात सातत्याने बदल होत राहिले. पिकासाठी केलेला खर्च, त्या तुलनेत उत्पादनातील घट शिवाय कोसळलेले बाजारभाव यामुळे बागायतदार शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. गतवर्षीपासून शासनाकडून मँगोनेट प्रक्रिया राबविण्यात आली. युरोपिय देशांनी गतवर्षी आंबा निर्यातीची दारे उघडली असली तरी त्या निर्यातीसाठी गरजेची असलेली उष्णजल प्रक्रिया मात्र उशिरापर्यंत लागू झाली नाही. त्यासाठी बाष्पजल प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ती प्रक्रिया केवळ वाशी (मुंबई) येथेच होते. आधीच आंबा कमी आणि त्यात ही प्रक्रिया करण्यासाठी वाशीला जावे लागणार असल्याने बागायतदारांनी त्याकडे बऱ्याचअंशी पाठ फिरवली. (प्रतिनिधी)
अवकाळीने नुकसान
मँगोनेटद्वारे आंबा निर्यातीसाठी ३१ निर्यातदार तयार होते. या अभियानांतर्गत एक हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट होते. मात्र, ६०० टन आंबाच (सर्व प्रकारचा मिळून) निर्यात करण्यात आला आहे. कोकणातील हापूसला चांगली मागणी होती.